प्रज्ञा म्हात्रे , ठाणे‘झिंगाट’ गाण्याचे सैराट अजूनही वेगवेगळ्या माध्यमांना, भाषांना वेड लावत असताना यंदाच्या गरबा नृत्यांनाही ‘झिंगाट’चा चरचरीत तडका मिळणार आहे. त्यामुळे गरब्याला मराठमोळा साज चढलेला पाहायला मिळेल. ओरिजनल ‘झिंगाट’सोबतच गरब्याचा ठेका दिलेला ‘झिंगाट गरबा’ यंदा सर्वत्र पाहायला मिळेल. सध्या ठाण्यात या झिंगाट गरब्याचा सराव सुरू असून आबालवृद्ध मोठ्या उत्साहात त्यात भाग घेत आहेत.‘सैराट’ चित्रपटातील ‘झिंगाट’ गाण्याने आबालवृद्धांना ‘याड लावलं’ आहे. सध्या समारंभापासून सर्वच सण-उत्सवांना झिंगाटचा फीव्हर चढला आहे. मग, एखादा विवाह सोहळा असो की आॅर्केस्ट्राकिंवा घरगुती मित्रमैत्रिणींची पार्टी असो ,‘झिंगाट’ गाण्यावर कोणी थिरकले नाही, तरच नवल! गणेशोत्सवातही सर्वत्र हेच गाणं वाजत होते. याचा प्रत्यय विसर्जन मिरवणुकीत सर्वांनाच आला. गणेशोत्सव् ाापाठोपाठ आलेल्या नवरात्रोत्सवातही झिंगाटची क्रेझ दिसून येणार आहे. चक्क झिंगाट गाण्यावर गरबा खेळला जाणार आहे आणि या गरब्याचे प्रशिक्षण नृत्यदिग्दर्शिका वैशाली सत्रा देत आहेत. ‘आम्ही झिंगाट या गाण्याला गुजरातच्या गरब्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे,’ असे त्यांनी सांगितले. पोपट, साल्सा, पारंपरिक गरबा, बॉलीवूड हे सर्व प्रकार एकत्र करून झिंगाट गरबा तयार केला आहे. गाण्याच्या सुरुवातीपासून ते गाणे संपेपर्यंत त्यावर विविध स्टेप्सचा गरबा खेळला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. या गरब्यात पाच वर्षांपासून ४५ वर्षांपर्यंतचे गरबाप्रेमी सहभागी होणार आहेत. झिंगाट गरब्यानंतर बेली, हिपॉप आणि पारंपरिक गरब्याचे कॉम्बिनेशन असलेला गरबाही यंदा पाहायला मिळेल. तरुणाईमध्ये सध्या बेली आणि हिपॉपची क्रेझ असल्याने हा आगळावेगळा गरबा त्यांना शिकवला जात आहे.अंधेरी येथे होणाऱ्या गरब्याच्या स्पर्धेत ठाण्यातील २० प्रोफेशनल गरबाप्रेमी १५० स्टेप्सचा दोडियो गरबा खेळणार आहेत. सोमवारपासून रात्री १० ते ११ यावेळेत ते सराव करणार आहेत. या गरब्यात २० ते ३५ वर्षे वयोगटांतील गरबाप्रेमींचा सहभाग असेल. वैशाली यांनी दोन महिन्यांपूर्वी गुजरातला जाऊन या गरब्याचे खास प्रशिक्षण घेतले आणि त्या त्यांच्यासोबत सहभागी होणाऱ्या प्रोफेशनल गरबाप्रेमींना हा गरबा शिकवणार आहेत.एकच जल्लोष!सध्या लहानांपासून मोठी मंडळीही ‘झिंगाट’वर थिरकताना दिसते. हेच लक्षात घेऊन शुक्रवारी या गाण्यावर गरबा सेट केला आणि ही संकल्पना माझ्याकडे शिकणाऱ्या गरबाप्रेमींपुढे मांडली. त्यांनी उत्सुकतेने ही संकल्पना उचलून धरत एकच जल्लोष केला. रविवारी मी त्यांना एका तासात हा गरबा शिकवला. सर्वांच्या आवडीचे गाणे असल्याने पटकन या गरब्याच्या स्टेप्स त्यांनी पिकअप केल्या. या गरब्याचा मराठी, गुजराती, पंजाबी, मारवाडी अशा सर्वच समाजांतील गरबाप्रेमी सराव करीत आहेत. - वैशाली सत्रा, नृत्यदिग्दर्शिका
गरब्याला ‘झिंगाट’चा तडका, खेळणारेही यंदा होणार सैराट
By admin | Published: September 26, 2016 2:12 AM