मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षपदाची माळ विद्यमान अध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्याच गळ्यात पडेल, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. या महिनाच्या अखेरीस या बाबतची अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. दानवे हे केंद्रात मंत्री असताना त्यांना तेथून प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात पाठविण्यात आले. ते जालन्याचे खासदार असून मराठा समाजाचे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या दोन्ही बड्या नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. सूत्रांनी सांगितले की, प्रदेशाध्यक्षपद होऊ शकतील अशांपैकी विनोद तावडे, चंद्रकांत पाटील हे कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांनी मंत्रीपद सोडून प्रदेशाध्यक्ष व्हावे, अशी पक्षाचीही इच्छा नाही. एक व्यक्ती एक पद या पक्षाच्या सूत्रानुसार मंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्ष एकाच व्यक्तीला दिले जाणार नाही. मंत्रीपद सोडून प्रदेशाध्यक्ष होण्याची कोणाची इच्छादेखील दिसत नाही. दानवे हे उद्या रविवारी दिल्लीला जात असून काही नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गेल्या वर्षभरातील निवडणुकीत भाजपाला चांगले यश मिळाले नाही त्यामुळे दानवे यांना पुन्हा संधी दिली जाणार नाही, असा तर्क दिला जात असला तरी भाजपाला सत्ता मिळाली नाही पण संख्याबळ मात्र वाढल्याने हा तर्क लागू होत नाही, असे काहींचे म्हणणे आहे.तसेच, विजयाचे श्रेय आणि पराजयाचे अपश्रेय हे सामूहिक असते अशी भूमिका आमच्या पक्षाने नेहमीच घेतली आहे, असे भाजपाच्या एक ज्येष्ठ नेते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)आधी जिल्हाध्यक्षांची निवड- भाजपाचे जिल्हाध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. ती २० जानेवारीपर्यंत चालेल. ८० टक्के जिल्हाध्यक्षांची निवड पूर्ण झाल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक घेता येते. त्यानुसार जिल्हाध्यक्ष आणि प्रत्येक विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले राज्य परिषद सदस्य यांची बैठक मुंबईत होईल आणि तीत प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाईल.आतापर्यंतच्या परंपरेनुसार ही बैठक एक औपचारिकता असते. श्रेष्ठींकडून सूचित केलेल्या नावाची सर्वांनाच कल्पना असते आणि त्यावर शिक्कामोर्तब केले जाते.
माळ दानवेंच्याच गळ्यात
By admin | Published: January 17, 2016 2:31 AM