नवी मुंबई : सारसोळे सेक्टर ६मधील जय दुर्गामाता भाजी मंडईला अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचा विळखा पडला आहे. मध्यरात्रीपर्यंत तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने दोन वर्षांपूर्वी जय दुर्गामाता भाजी मंडईचे बांधकाम केले आहे. तत्कालीन नगरसेवक नारायण पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मार्केट सुरू करण्यासाठीही त्यांनी प्रशासनाकडे वारंवार चर्चा केली होती; पण ओटलेवाटपाचे धोरण निश्चित झाले नसल्याने मार्केट सुरू होऊ शकलेले नाही. बांधकाम पूर्ण होऊन दोन वर्षे झाल्यानंतरही त्याचा वापर होत नसल्याने आता अमली पदार्थांचे सेवन करणारे व मद्यपींनी मार्केटचा ताबा घेतला आहे. रोज रात्री १० नंतर येथे गांजा व इतर अमली पदार्थांचे सेवन करत तरुणांचा घोळका बसलेला असतो. अनेकजण येथे मद्यपान करत असल्याचेही वारंवार निदर्शनास येऊ लागले आहे. मार्केटमधील जागा अपुरी पडू लागल्याने व्यसनी तरुणांनी आता शेजारील उद्यान व मैदानामध्येही बसण्यास सुरुवात केली आहे. अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांमुळे येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दत्तगुरू व एव्हरग्रीन सोसायटीमधील नागरिक व उद्यानामध्ये सकाळी, सायंकाळ जाणारे सारसोळे गाव व परिसरातील नागरिक मार्केटजवळील रस्त्याचा वापर करतात. भविष्यात एखादी दुर्घटना होऊ नये, यासाठी पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे; पण पोलीस याकडे दुर्लक्ष करत आहेत. याशिवाय पालिकेने मार्केटमधील ओटल्यांचे वाटप करून त्याचा प्रत्यक्ष वापर सुरू केला, तर अवैध प्रकार आपोआप थांबतील, अशी प्रतिक्रिया रहिवाशांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
सारसोळेमधील भाजी मार्केटमध्ये गर्दुल्यांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2017 2:49 AM