लाखो रुपयांचे नुकसान : चार तासांनंतर आग आटोक्यात
सोलापूर: शेळगी परिसरातील बसवेश्वर नगरात शॉर्टसर्किट होऊन गॅसचा स्फोट झाल्याने आजूबाजूच्या १३ घरांना फटका बसला. सुदैवाने यात कोणतीही जीविहानी झाली नाही. या भीषण आगीत तब्बल ५० लाखांहून अधिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.सायंकाळी सहाच्या सुमारास शेळगीतील मित्रनगर या विस्तारित भागातील बसवेश्वर नगरमध्ये युसूफ बागवान (वय ४६) यांच्या घरात शॉर्टसर्किट होऊन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. अचानक झालेल्या मोठ्या आवाजामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. प्रारंभी काय झाले कोणालाच समजेना. एकच हलकल्लोळ उडाला. आजूबाजूच्या नागरिकांपैकी एकाने तातडीने सव्वासहाच्या सुमारास अग्निशामक दलाशी संपर्क साधून घडल्या प्रकाराची माहिती दिली. पहिली गाडी साधारण साडेसहाच्या सुमारास घटनास्थळी पोहोचली. आगीच्या ज्वाळा, धुराचे लोट आणि रडण्या-ओरड्याचा एक हलकल्लोकळ सुरु होता. बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कोणीही काही सांगण्याच्या मन:स्थितीत नव्हते. जिकडे तिकडे रडण्याचा आवाज येत होता. पहिल्या आवाजाने आणि आगीच्या लोटामुळे आजूबाजूच्या घरातील लोकांनी गर्भगळीत होऊन जीवाच्या आकांताने बाहेर धूम ठोकली. यामुळे या भीषण प्रकारात सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही. युसूफ बागवान यांच्या घरात झालेल्या स्फोटानंतर आजूबाजूच्या जवळपास १३ घरांनीही वाऱ्याच्या वेगाने एकापाठोपाठ पेट घेतला. रात्री नऊपर्यंत धुमसणारी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु होता. सायंकाळी ६.३० ते सव्वानऊपर्यंत अग्निशामक दलाच्या १२ आणि खासगी दोन टँकरद्वारे पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणण्यात आली.
या घरांना बसला स्फोटाचा फटकागॅस स्फोटामुळे बसवेश्वर नगरातील १३ घरांना फटका बसल्याचे प्राथमिक तपासणीत आढळले आहे. यामध्ये अल्लाउद्दीन अब्बास शेख (वय ४६), दौलत अब्बास सय्यद (४२), सादिक मिरेदी (वय २५), शुकूर सय्यद (वय ५०), शेखलाल शेख (वय ४०) युसूफ यासीन बागवान (वय ५५), रफिक शाबुद्दीन मिरेदी (वय ४५), महंमद दस्तगीर शेख, रफिक अब्बासअली बागवान (वय ५५), अहमद अल्लाउद्दीन तांबोळी (वय ६०), सिद्धप्पा रामचंद्र व्हनमोरे (वय ५५), रेवणसिद्ध होळगी (६०), महादेवी बसण्णा बोल्लेळे (वय ४०) यांचा समावेश आहे.
पालकमंत्र्यांची घटनास्थळी भेट बसवेश्वर नगरातील घटना दुर्दैवी असून, शासनाकडून संबंधितांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असून, प्रशासनाला तशा सूचना दिल्या असून, कोणावरही अन्याय होणार नाही, अशा शब्दात फटका बसलेल्या नागरिकांचे सांत्वन केले. झाल्या प्रकाराबद्दल आपण जिल्हाधिकाऱ्यांना कल्पना दिलेली आहे. ज्यांच्या घरांचे या स्फोटामुळे नुकसान झाले आहे त्यांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत. - विजयकुमार काळम-पाटील, मनपा आयुक्त