मुंबई : सुमारे सत्तर वर्षे जुने पिंंपळाचे झाड तोडताना महानगर गॅसची पाइपलाइन फुटल्याने आग लागण्याची घटना सोमवारी मालाड (पूर्व) येथील महिंद्रानगर येथे घडली.कैलाशचंद्र सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात मुलांच्या उद्यानालगत असलेले पिंंपळाचे झाड गेल्या काही वर्षांपासून वठले होते. त्यामुळे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी ते झाड मुळापासून उघडण्याचे काम सुरू केले. जेसीबीच्या सहायाने हे काम सुरू असताना वीज केबलचे नुकसान झाले तसेच महानगर गॅसची पाईपलाईन फुटून आग लागली. याच ठिकाणापासून वीस फुटांवर विजेचे उपकेंद्र आहे. या प्रकारामुळे येथे जोरजोरात ठिणग्या उडून आग लागली. या दरम्यान काही स्फोटही झाल्याचे रहिवाशांनी सांगितले.अग्रिशमन दल तसेच महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन तास लागले. मात्र या घटनेमुळे सायंकाळी उशीरापर्यंत या भागातील वीज तसेच महानगरचा गॅसपुरवठा खंडीत झाला होता. सफाईच्या नावाखाली सोसायटीने महापालिकेकडून परवानगी घेत झाडे तोडण्याचे प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असून कालच्या घटनेत झाड पाडण्यापूर्वी तेथील वीज आणि गॅसपुरवठा बंद करणे आवश्यक होते. मात्र ते टाळून अपघातास कारणीभूत ठरलेल्या पदाधिकाऱ्यांविरूद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी येथील रहिवाशी मोहन कृष्णन यांनी केली आहे.
झाड तोडताना गॅस पाइपलाइन फुटून आग
By admin | Published: September 20, 2016 2:29 AM