रत्नागिरी : स्पेनमधून रत्नागिरीकडे निघालेले गॅस मॅरेथॉन’ हे व्ही. एस. एन. गॅस भरलेले जहाज इंजिनात बिघाड झाल्याने पावसजवळील समुद्रात गेल्या तीन दिवसांपासून अडकून पडले आहे. या जहाजाच्या दुरुस्तीला अजून दोन दिवस लागतील. जहाजावर भारतीय तटरक्षक दलाच्या गस्तीनौका नजर ठेऊन आहेत, अशी माहिती रत्नागिरी विभाग भारतीय तटरक्षक दलाचे कमांडंट एस. एम. सिंग यांनी आज (मंगळवार) प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. टाळकेश्वर येथील लाईट हाऊसच्या कॅमेऱ्यातून २९ नोव्हेंबर २०१४ रोजी हे जहाज पावसजवळच्या समुद्रात थांबलेल्या स्थितीत दिसून आल्यानंतर त्याबाबतचा संदेश तटरक्षक दलास मिळाला. त्यानंतर या जहाजाची तपासणी करण्यात आली. जहाजाच्या इंजिनात बिघाड झाल्याने जहाज नांगर टाकून किनाऱ्यापासून काही अंतरावर समुद्रात उभे केल्याची माहिती जहाच्या कप्तानाने तटरक्षक दलास दिली. पावसपासून तीन किलोमीटर अंतरावर समुद्रात हे जहाज आहे. इंजिनातील बिघाड दुरुस्त करण्यासाठी लागणारे पार्टस मुंबईतून येणार आहेत. जहाजाच्या दुरुस्तीसाठी अजून दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. हे जहाज तटरक्षक दलाच्या संपर्कात असून, दलाच्या गस्ती नौका या जहाजावर लक्ष ठेवून आहेत. गेल्या काही वर्षात अतिरेक्यांनी स्फोटकांच्या वाहतुकीसाठी सागरी मार्गाचा वापर केल्यानेच तटरक्षक दल सावध झाले आहे. या जहाजात ५७६७ मेट्रिक टन व्हीएसएन गॅस भरलेला असून, जहाजावर फिलिपाईन्सचे नागरिकत्व असलेल्या कप्तानासह २० कर्मचारी आहेत. स्पेनहून निघालेल्या या गॅसवाहू जहाजाचे अंतिम स्थानक रत्नागिरी असून, दुरुस्तीनंतर आपल्या नियोजित स्थळी हे जहाज जाईल. त्यानंतर पुन्हा परतेल, अशी माहितीही जहाज कप्तानाच्या हवाल्याने देण्यात आली. (प्रतिनिधी)पावसपासून जवळच समुद्रात नांगर टाकून उभ्या असलेल्या या जहाजाबाबत तेथील नागरिकांत उलटसुलट चर्चा सुरू आहे. याबाबत नागरिकांना उत्कंठा होती व मनात भीतीचे वातावरणही होते.
पावसजवळ गॅसवाहू जहाज अडकल
By admin | Published: December 02, 2014 10:55 PM