आदिवासींसाठी नवे कायदे आणणार, राहुल गांधी यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 12:06 PM2022-11-21T12:06:58+5:302022-11-21T12:07:08+5:30
भारत जोडो पदयात्रेत आदिवासी कष्टकरी महिलांचा मेळावा..
जयदेव वानखडे -
जळगाव जामोद (जि. बुलढाणा) : आदिवासींचे पर्यावरणाशी अतिशय जुने नाते आहे. त्यांची भाषा जगण्याची पद्धत वेगळी असली तरी इतरांपेक्षा कमी नाही. यूपीए सरकारने आदिवासींना वन जमिनीचा अधिकार दिला तो त्यांचा हक्क आहे, आमचे सरकार आल्यावर त्यांच्यासाठीचे कायदे दुपटीने मजबूत करून आदिवासींसाठी नवे कायदे आणणार असल्याचे आश्वासन प्रतिपादन खासदार राहुल गांधी यांनी दिले.
भारत जोडो पदयात्रा रविवारी जळगाव जामोद येथे पाेहाेचली़ यावेळी येथे लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने आदिवासी कष्टकरी महिलांचा मेळावा घेण्यात आला. महिला मेळाव्याला संबाेधित करताना त्यांनी महिलांना ३० टक्के आरक्षण दिले असून, मनरेगाच्या माध्यमातून कामाची हमी दिली असल्याचे सांगितले. भारत जोडो यात्रेचे लक्ष देश जोडणे आहे, हिंसा अन्याय याविरुद्ध लढण्यासाठी आम्ही निघालो आहोत. सध्या देशात महिला असुरक्षित आहेत. जो देश महिलांचा सन्मान करत नाही तो पुढे जाऊ शकत नाही. बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत़ महिला जातीचा अपमान हाेताना दिसत असल्याची त्यांनी चिंता व्यक्त केली.
‘आमच्यासाठी तुम्ही आदिवासी...’
माझी आजी स्वर्गीय इंदिराजी गांधी यांनी मी लहान असताना मला एक पुस्तक वाचायला दिले त्याचे नाव होते ‘तेंदू एक आदिवासी बच्चा’.
ते पुस्तक मला खूप आवडायचे़ मी माझ्या आजीकडून ते ऐकायचो. मोठा झाल्यावर मला एका प्रदर्शनामध्ये ते पुस्तक पाहायला मिळाले . या भारत भूमीवर पहिला अधिकार आदिवासींचा आहे. तेच जंगलाचे मालक आहेत. परंतु त्यांना वनवासी संबाेधले जात आहे.
कोणताही वनवासी शहरात राहून डॉक्टर, इंजिनिअर होऊ शकणार नाही का? असा प्रश्न उपस्थित करत आमच्यासाठी तुम्ही वनवासी नाही तर आदिवासीच आहात असा विश्वासही राहुल गांधी यांनी या आदिवासी मेळाव्यातून दिला. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या जिलाबाई वसावा, बेनुबाई पाडवी, नंदा पावरा, यशोमती ठाकूर, डॉ. स्वाती वाकेकर, अंजली टापरे, ज्योती ढोकणे, हेमप्रभादेवी, प्रेमलता सोनोने मंचावर उपस्थित होते.