जितेंद्र कालेकर, ठाणेसंपूर्ण जगात अतिशय दुर्मीळ असलेल्या आणि ‘नासा’च्या मोहिमेत उपयोगात येणाऱ्या ‘स्पेंडर लोरीस’ या आदिमानवाच्या प्रजातीसमान असलेल्या माकडांची विक्री करण्यास आलेल्या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती पथकाने अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत करोडोंची किंमत असलेली ही चारही माकडे ताब्यात घेण्यात आली. ‘स्पेंडर लोरीस’ ही माकडे आदिमानवासमान प्रजातीमध्ये ओळखली जातात. त्यामुळे अंतराळ मोहिमेत त्यांचा विशेष उपयोग होतो. भारतात कोल्हापूरच्या चंदगड, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि श्रीलंका याच भागात आढळणारी ही प्रजाती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे जगात ती अगदी मोजक्याच ठिकाणी अल्पसंख्येने आढळून येतात, अशी माहिती वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली. या दुर्मीळ माकडांची विक्री करण्यासाठी दोघे जण येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस आयुक्त विजय कांबळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सापळा लावून घोडबंदर भागातून या दुकलीला पकडले. प्रत्येकी आठ लाख रुपये असा ३२ लाखांना या चार ‘स्पेंडर लोरीस’चा सौदा करण्यात येणार होता.
कोट्यवधींची स्पेंडर माकडे विकणारे ठाण्यात गजाआड
By admin | Published: December 06, 2014 3:00 AM