पणजी : लोकमत वृत्तपत्र समूहाच्या नि:पक्ष व निर्भीड पत्रकारितेचा गोवा विधानसभेत गौरव करण्यात आला. गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांना सासवड येथे प्रतिष्ठेचा आचार्य अत्रे पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे विधानसभेत अभिनंदन करतानाच ‘लोकमत’च्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीबद्दल सदस्यांनी गौरवोद्गार काढले.कला, संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी अभिनंदनाचा हा विशेष ठराव मांडला. त्यावर बोलताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले, नायक यांची भूमिका तात्विकदृष्ट्या माझ्याविरोधात असते; पण त्यांनी कधीच दोघांमध्ये शत्रुत्व येऊ दिले नाही. विरोधक असूनही एखाद्या माणसाबरोबर चांगले संबंध कसे ठेवावेत, हे त्यांच्याकडून शिकावे. काही चुकीच्या गोष्टी छापून आल्या तर ज्या काही निवडक संपादकांना मी फोन करून सत्य सांगतो, त्यातील ते एक आहेत. ते ऐकूनही घेतात आणि नंतर वस्तुस्थितीही मांडतात.माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत म्हणाले, १९९४ मध्ये मडगाव मतदारसंघात राजू माझ्याविरुद्ध निवडणूक रिंगणात उतरले; पण आमची मैत्री कायम राहिली. ते लिखाणातून परखडपणे विचार मांडतात. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी सरकारच्या धोरणांवर अनेकदा प्रखरपणे टीका केली; परंतु संबंधांमध्ये कधीच कटुता येऊ दिली नाही. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, कला, संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनीही नायक यांचे कौतुक केले.
‘लोकमत’शिवाय चैन पडत नाही - पर्यटनमंत्रीपर्यटनमंत्री बाबू आजगावकर म्हणाले, नायक संपादक असलेले ‘लोकमत’ वर्तमानपत्र सकाळी वाचल्याशिवाय चैन पडत नाही. खासकरून कुजबुज हा स्तंभ. त्यांनी प्रत्येक विषय कोणाचीही पर्वा न करता धाडसाने हाताळला. मडगावमध्ये झोपडपट्टी पुनर्वसनासाठी मी लढा दिला, तेव्हा त्यांच्यात व माझ्यात मतभेद होते. मात्र त्यांनी कटुता येऊ दिली नाही. त्यांनी लेखणी नेहमी समाजाच्या भल्यासाठी वापरली.