राज्य पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल ८७ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना सोमवारी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदके, तसेच गुणवत्तापूर्ण सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले. राजभवनातील दरबार हॉलमध्ये हा सोहळा पार पडला. सहा पोलीस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक, तर ७४ पोलीस अधिकारी व जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक देण्यात आले. यात तुरुंग विभागाचे महानिरीक्षक डॉ. बी. के. उपाध्याय, सीआयडीचे प्रमुख संजय कुमार, अप्पर महासंचालक (नि व सं.) राजेंद्र सिंग, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे विशेष महानिरीक्षक सदानंद दाते, मुंबई वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त शशीकांत तळेगावकर, सहायक आयुक्त सुनील देशमुख, निवृत्त निरीक्षक मोतीराम पाखरे आदींचा समावेश होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) राम शिंदे, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित व गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
गौरव मुंबई पोलिसांचा
By admin | Published: February 23, 2016 2:48 AM