- उमाकांत कांबळे / ऑनलाइन लोकमत
लोहारा (ता. उदगीर), दि. 10 - उदगीर तालूक्यातील भाकसखेडा (पूर्व) येथील उस्मानखाँ पठाण या मुस्लीम कुटुंबात गेल्या तीन पिढ्यांपासून विधिवत गौरी पूजन केले जाते. धर्माच्या पलिकडे जाऊन त्यांच्या घरात साजरे होणारे हे गौरीपूजन जिल्ह्यात कुतूहलाचा विषय ठरले आहे. या सामाजिक सलोख्याची परिसरात जोरदार चर्चा असून परिसरातील शेकडो लोकांनी त्यांच्या घरी जावून गौरीचे दर्शन घेतले.
याबाबत सविस्तर वृत असे कि, लोहारा पासून ३ किमी अंतरावर असलेले भाकसखेडा (पूर्व) हे अवघ्या ३०० लोकवस्तीचे गावं. गाव छोटे असले तरी या गावात अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. येथील वयाची सत्तरी ओलांडलेल्या उस्मानखाँ रसूलखाँ पठाण यांच्या कूंटूबात तीन पिढ्यापासून विधिवत गौरी पूजन केले जाते. गौरीच्या सजावटी साठी व देखाव्या साठी ते दरवर्षी हजारो रूपये खर्च करतात.
त्यांचा हा सामाजीक सद्घभावनेचा उपक्रम पाहण्यासाठी परिसरातील लोहारा,करखेली,नरसिंगवाडी,दावणगाव,कूमठा येथून शेकडो नागरीक येतात आणि दर्शन घेउन जातात.केवळ गौरी पूजनचं नव्हे तर गणपती च्या स्थापनेपासून ते विसर्जना पर्यंत आणि नवराञ उत्साहातील प्रत्येक कार्यक्रमात ते हिरहिरीने भाग घेतात.
याबरोबरचं स्व धर्माच्या ईद,मोहरम या उत्सवावातही त्यांचा सिंहाचा वाटा असतो.मोहरम चा मान हि त्यांच्याच कूंटूबाला आहे.
आजच्या काळात दिवसेंदिवस जातीय तेढ वाढत असून आपलीच जात किंवा धर्म कसा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याची चढाओढ चालू आहे. पण उस्मानखाँ रसूलखाँ पठाण यांच्या कुटुंबात स्वधर्मा बरोबर ईतर धर्मींयांच्याही चालीरिती परंपरा गेल्या कित्येक वर्षापासून जपल्या गेल्या आहेत.
याबाबत उस्मानखाँ यांचेशी बोलले असता ते म्हणाले कि,"आमच्या कूंटूबात गौरी पूजन करणारी माझ्या घरातील तिसरी पिढी आहे. यापुढील पिढीतही हा आर्दश जोपासला जाईल. देव सगळ्यांचा आहे. सबका मालिक एक है! एवढेच या निमित्ताने आम्हाला सांगायचे असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले.