मुंबई: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार व रंगकर्मी आणि वस्त्रहरणकार म्हणून ओळख असणाऱ्या गंगाराम गवाणकर यांची निवड झाली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत गंगाराम गवाणकर यांची नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आल्याचे नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी घोषित केले. यंदा नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेच्या दरम्यान गंगाराम गवाणकर यांच्यासह प्रेमानंद गज्वी, विश्वास मेहेंदळे आणि श्रीनिवास भणगे यांची नावे परिषदेकडे आली होती. नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत या नावांवर विचारविनिमय होऊन गंगाराम गवाणकर यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाल्याचा आनंद निश्चित आहे. आयुष्यभर नाटकाचे कपडे घालूनच मी फिरत आलो आहे. हे सिंहासन अनेक मोठ्या व्यक्तींनी आतापर्यंत भूषविले आहे आणि हे भाग्य आता माज्या वाट्याला आले आहे. नाट्यसृष्टीतील अनेक सहकारी, मित्र, हितचिंतक यांच्या सहकायार्मुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे याची मला जाणीव आहे, अशी प्रतिक्रिया गंगाराम गवाणकर यांनी दिली.
नाट्य संमेलनाध्यक्षपदी गवाणकर
By admin | Published: October 19, 2015 2:28 AM