पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आम्ही पाळत आलो आहोत. आम्ही सत्तेच्या मागे कधी गेलो नाही. जनतेसाठी खासदारकी फुकून टाकली. आता वन मॅन शो, अशा शब्दांत माजी खासदार आणि भाजपा नेते उदयनराजे भोसलेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. छत्रपती शिवाजी महाराजांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुलना करणाऱ्या 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' वादग्रस्त पुस्तकावर उदयनराजेंनी जोरदार टीका केली. वादग्रस्त पुस्तक मागे घेतलं नसेल, तर मागे घ्यायला लावू. संबंधितांवर कारवाई करायला लावू, अशा शब्दांत उदयनराजे कडाडले. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. माझ्या बुद्धीला जे पटत नाही, ते मी करत नाही. त्यामुळेच निवडून आल्यानंतरही खासदारकीचा राजीनामा दिला. सत्तेच्या मागे आम्ही कधी गेलो नाही. माझं नातं सर्वसामान्य लोकांशी आहे. त्यांच्यासाठी मी जीव द्यायलाही तयार आहे. आम्ही काय करायचं हे इतरांनी सांगू नये, अशा शब्दांत उदयनराजेंनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचा अप्रत्यक्षपणे समाचार घेतला. 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन भाजपावर टीका करताना राऊत यांनी भाजपामध्ये गेलेल्या शिवरायांच्या वंशजांनी भूमिका स्पष्ट करावी, असं आवाहन केलं होतं. त्यावरुन उदयनराजे शिवसेनेवर कडाडले. शिवसेना भवनावर बाळासाहेबांचा फोटो शिवरायांच्या वर का?, असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला. पक्षाला शिवसेना नाव दिलं, तेव्हा शिवरायांच्या वंशजांना विचारायला आला होतात का? महाशिवआघाडीमधून शिव शब्द का काढला? सोयीप्रमाणे राजकारण करायचं ही यांची लायकी. शिववडा नावाचा वडापाव सुरु करण्यात आला. शिवाजी महाराजांचं नाव वडापावला कसं देता? आम्ही शिवसेना नावाला कधीही हरकत घेतली नाही. शिवसेनेनं नाव बदलून ठाकरे सेना करावं, अशा शब्दांत उदयनराजेंनी शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला. यावेळी उदयनराजेंनी शरद पवारांवरदेखील नाव न घेता जोरदार टीका केली. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज. अनेकांना जाणता राजाची उपमा देतात. त्याचाही मी निषेध करतो. जाणता राजा उपमा देताना विचार करण्याची गरज आहे, असं उदयनराजे म्हणाले.
खासदारकी फुकून टाकली, आता वन मॅन शो; उदयनराजेंचं 'मिशन' ठरलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 1:46 PM