लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शंभरपेक्षा जास्त लोकांचा बळी घेणाऱ्या मालवणी दारूकांडातील प्रमुख फरार आरोपीस ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने सोमवारी मध्य प्रदेशातून अटक केली. जून २0१५ मध्ये मालवणी येथे गावठी दारूमुळे विषबाधा होऊन जवळपास १0६ रहिवाशांचा बळी गेला होता. या प्रकरणी मुुंबईत गुन्हा दाखल असून, आरोपीचा शोध गेल्या दोन वर्षांपासून सुरू होता. दारूबंदी कायद्यान्वये शिळडायघर पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना मालवणी दारूकांडातील आरोपीची माहिती पोलिसांना मिळाली. मालवणी दारूकांडातील आरोपींना विषारी दारू बनविण्यासाठी लागणाऱ्या घातक रसायनाचा पुरवठा धर्मेंद्रसिंग शिवबलीसिंग तोमरने केला होता. तो मध्य प्रदेशातील इंदूर येथे असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांचे पथक इंदूर येथे पाठवून आरोपीला सोमवारी अटक करण्यात आली. शीळडायघर येथील गुन्ह्यामध्येही अवैध दारू बनविण्यासाठी घातक रसायनाचा पुरवठा केल्याची कबुली त्याने दिली. आरोपीला २५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालवणी दारूकांडातील मुख्य आरोपी गजाआड
By admin | Published: May 23, 2017 3:26 AM