मुंबई : जागतिक पातळीवर आघाडीच्या जनरल इलेक्ट्रिक या उद्योग समूहाने महाराष्ट्रात ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. स्वीत्झर्लंडमधील दाओस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जीईचे उपाध्यक्ष जॉन राईस यांच्यात झालेल्या चर्चेनंतर कंपनीने हा निर्णय जाहीर केला.जीई ही अमेरिकन कंपनी ऊर्जा, वित्त, आरोग्य, विमानांच्या इंजिनांची निर्मिती आदी क्षेत्रातील उत्पादक कंपनी आहे. ३ हजार कोटींच्या गुंतवणुकीतून जीई कंपनी प्लॅटफॉर्म टर्बाईन्सची निर्मिती करणार आहे. त्यांचा उपयोग वीज प्रकल्पांसाठी होतो. लिफ्ट निर्मितीत जगात अग्रेसर असलेल्या शिंडलर या उद्योग समूहाने दुसऱ्या टप्प्यात तळेगाव (पुणे) येथे विस्तारित प्रकल्पासाठी गुंतवणूक करण्याचे जाहीर केले आहे. काल मुख्यमंत्र्यांशी या समूहाचे जॉर्गेन टिंगरेन यांनी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी नेस्ले, वायसी, शिंडलर, पेप्सीको, व्हिडीओकॉन, बजाज आदी उद्योग समूहांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या चर्चेत राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी सहभागी झाले होते. (विशेष प्रतिनिधी)जपानी कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणुकीस इच्छुक असल्याचे जापनीज ट्रेड आॅर्गनायझेशनचे प्रमुख हिरोयुकी ईशिगे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी मित्सुई कंपनीचे केनीची होरी यांच्याशी चर्चा केली. कॉग्नीझेंट या कंपनीला पुण्याजवळ हिंजेवाडी येथे जमीन हवी आहे.
जीई करणार ३ हजार कोटींची गुंतवणूक
By admin | Published: January 23, 2015 2:11 AM