ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरात पळवत असल्याचे सांगितले जात असले तरी कार निर्मिती क्षेत्रातील ख्यातनाम आंतरराष्ट्रीय कंपनी जनरल मोटर्सने गुजरातऐवजी महाराष्ट्रातील तळेगावमधील प्रकल्पाला पसंती दिली आहे. जनरल मोटर्सने गुजरातमधील प्रकल्प बंद करुन महाराष्ट्रातील प्रकल्पाची उत्पादन क्षमता वाढवण्याची घोषणा केली आहे.
जनरल मोटर्सचे अध्यक्ष डॅन अमान यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भारतात १ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली. जनरल मोटर्सचे सध्या भारतात गुजरातमधील हलोल व महाराष्ट्रातील तळेगाव येथे प्रकल्प आहेत. यातील हलोल प्रकल्पात दरवर्षी १ लाख २७ हजार गाड्या होतात. मात्र आता कंपनीने हलोलमधील प्रकल्प बंद करुन तळेगावमधील प्रकल्पावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतल्याचे अमान यांनी सांगितले. तळेगाव प्रकल्पाची क्षमता आणखी वाढावा यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरु असून या प्रकल्पात आगामी पाच वर्षात सुमारे सव्वा दोन लाख गाड्यांची निर्मिती होणे अपेक्षीत आहे असे त्यांनी सांगितले. जनरल मोटर्स १ अब्ज रुपयांची गुंतवणूक करेल व यातून सुमारे १२ हजार रोजगार निर्माण होतील असेही त्यांनी स्पष्ट केले.