- रोहन वावधाने (मानोरी, जि.नाशिक)
सध्या शेतकरी सर्वच बाजूने उदासीन झाला असून, घाम गाळून पिकविलेल्या मालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने केलेला खर्चही भरून निघणे अवघड झाले आहे. अशा स्थितीत मानोरी बुद्रुक येथील प्रगतिशील शेतकरी बाबासाहेब बोराडे यांनी पारंपरिक पद्धतीच्या शेतीला फाटा देत आपल्या ७ गुंठे शेतात अजय अंकुर वांग्याची लागवड केली आहे. या ७ गुंठ्यांतील वांग्यातून त्यांना एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यात तीस हजार रु पये खर्च वजा जाता ७० हजार रुपये निव्वळ नफा मिळाला आहे.
वांगे पिकाची यशस्वी लागवड करून शेतकऱ्यांसमोर त्यांनी नवा आदर्श उभा केला आहे. बाबासाहेब बोराडे यांनी सुरुवातीला ७ गुंठ्यांत ५ बाय ७ अंतरावर बैलजोडीच्या साहाय्याने सरी पाडल्या. त्यावर मल्चिंग पेपरचे आच्छादन करून त्यात प्रत्येकी ५ फुटांच्या अंतरावर वांग्याची रोपे लावली. नोव्हेंबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ पर्यंत विहिरीत मुबलक पाणी साठा असल्याने वेळेवर पिकाला पाणी दिले. त्यामुळे झाडे नेहमी हिरवीगार राहत होती. फेब्रुवारीनंतर मात्र पाण्याची टंचाई जाणवण्यास सुरुवात झाल्याने बोराडे यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून वांग्याची झाडे जगवली.
वातावरणात बदल झाल्यास किडीचा प्रादुर्भाव होत असल्याने बुरशीनाशक, पोषक, काईट, नोवान, क्लोरो कीटकनाशकांची वेळोवेळी फवारणी केली, त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव कमी झाला. येवला, मुखेड, जळगाव नेऊर, देवगाव, देशमाने, लासलगाव आदी गावांतील आठवडी बाजारात जाऊन बाबासाहेब बोराडे ४० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने हात विक्री करतात. यापुढे सुमारे दोन महिने वांग्याचे उत्पादन मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे. त्यातून त्यांना २५ हजार रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. इतर शेतकऱ्यांनीही अशा नव्या पीकपद्धतीच्या अवलंब करून कमी क्षेत्रात, कमी खर्चात जास्त उत्पादन मिळणाऱ्या भाजीपाल्याची लागवड केल्यास शेतीतूनही चांगले उत्पन्न मिळू शकते, असे बोराडे सांगतात.
व्यापारी शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाहीत म्हणून ओरड करण्यापेक्षा आपल्या पिकासाठी आपणच बाजारपेठ निर्माण केल्यास त्याचा शेतकऱ्यांना अधिक फायदा होऊ शकतो हे बोराडे यांच्या प्रयत्नातून दिसून येते. वांगे तोडून ते थेट आठवडी बाजारात नेणे आणि स्वत:च त्याची विक्री केल्याने बाजाराचा नेमका कलही त्यांना समजला. येवला तालुक्यात बहुसंख्य शेतकऱ्यांचा कल कांदा पिकाकडे असतो, कांद्याला हजार रुपये क्विंटल भाव मिळाला तरी परवडते, असे शेतकरी म्हणतात. कांद्यापेक्षा इतर पिकातही चांगला पैसा मिळू शकतो, हेच या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. वर्षानुवर्षे पारंपरिक पीक करण्यापेक्षा वेगळा प्रयोग करण्यास काय हरकत आहे? आपण पिकवलेला माल आपणच विकला तर जास्तीचे पैसे मिळतील.