मुंबई, दि.18 - हॉटेल उद्योगाला लागणाऱ्या परवान्यांची संख्या कमी करण्याबरोबर त्यामध्ये सुलभता आणावी, मुंबईसारख्या ठिकाणी फूड ट्रक सुरू करण्यासाठी विशेष धोरण तयार करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. नॅशनल रेस्टॉरंट ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी खासदार पूनम महाजन उपस्थित होत्या. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
हॉटेल उद्योगातून दरवर्षी 35 हजार कोटींची उलाढाल एकट्या मुंबई शहरात होते आणि या माध्यमातून पाच लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. हॉटेलसाठी परवाना घेताना विविध विभागांशी संबंध येतो. यासाठी एक संस्था हवी अशी मागणी यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी केली. मुंबई महापालिकेने यासंदर्भात परवान्यांची संख्या कमी करण्यासाठी पावले उचलली असून जवळपास 29 प्रकारच्या परवानग्या कमी करण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
फूड ट्रक ही उत्तम संकल्पना असून कार्यालये, पर्यटनस्थळे याठिकाणी गरमागरम खाद्यपदार्थ मिळू शकतील. याकामी स्वयंसहायता बचत गटांना देखील फायदा मिळू शकतो. फूड ट्रकसाठी विशेष धोरण तयार करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी हॉटेल व्यवसायाशी संबधित मुद्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता आदी अधिकारी उपस्थित होते.