लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै/ आॅगस्ट २०१७मध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी येत्या सोमवारपासून (दि. १९) नियमित शुल्कासह तर येत्या २७ जूनपासून विलंब शुल्कासह आॅनलाइन प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहेत. राज्य मंडळातर्फे सप्टेंबर/ आॅक्टोबर २०१७ऐवजी जुलै / आॅगस्ट महिन्यांत दहावीची पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने परीक्षा अर्ज भरावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांकडून १९ ते २६ जून या कालवधीत नियमित शुल्कासह तर २७ ते ३० जून या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज स्वीकारले जातील. विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून आॅनलाइन अर्ज भरता येईल, असे मंडळाने कळविले आहे.
दहावीचे पुरवणी परीक्षा अर्ज उद्यापासून घेणार
By admin | Published: June 18, 2017 12:33 AM