नोबेलविजेत्या इ. योनाथ : भारती विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभपुणे : ज्ञान ही मोठी शक्ती असून, या शक्तीच्या आधारे अमर्याद गोष्टींचा शोध घेता येतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यातच अधिकाधिक ज्ञान मिळवावे. केवळ पैसा, पुरस्कार आणि सन्मानासाठी ज्ञान मिळवू नये, असे मत इस्राईलच्या नोबेल पुरस्कारप्राप्त संशोधक प्रा. अदा. इ. योनाथ यांनी व्यक्त केले.भारती विद्यापीठाच्या सोळाव्या पदवीप्रदान समारंभात त्या बोलत होत्या. विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, कुलसचिव जी. जयकुमार, परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ. विश्वास धाप्ते, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते २१ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके आणि ५४ विद्यार्थ्यांना पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली.योनाथ म्हणाल्या, ‘‘काही कारणास्तव शिक्षण घेता येत नाही, त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आजच्या तरुण पिढीने प्रयत्न केले पाहिजेत. गरीब आणि श्रीमंती यांच्यातील दरी कमी करण्यासाठी शिक्षण हे एक प्रभावी साधन असून, त्याचा उपयोग करायला हवा.विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर जाण्यासाठी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. ज्ञान मिळवताना आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. तसेच, जीवन समजून घेणे हासुद्धा ज्ञान मिळविण्याचा उद्देश असला पाहिजे.’’आपला जीवनप्रवास उलगडताना योनाथ म्हणाल्या, ‘‘एका गरीब कुटुंबात माझा जन्म झाला. घराजवळील सर्वसामान्य शाळेत मी शिक्षण घेत होते. परंतु, मी चांगल्या शाळेत शिक्षण घेतले पाहिजे, यासाठी माझ्या शिक्षिकेने प्रयत्न केले. मी पडेल ते काम करून शिक्षण घेतले. दरम्यान, वडिलांचे अकाली निधन झाले. परंतु, शिक्षण घेण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असल्यामुळे मी संशोधन क्षेत्रात काम करू शकले.माझ्या संशोधनाचा विषय जगातल्या संशोधकांना परिकल्पनेप्रमाणे वाटत होता. मात्र, या स्वप्नाला मी सत्यात उतरवले.’’शिवाजीराव कदम म्हणाले, ‘‘आजच्या नव्या युगात टिकून राहण्यासाठी सर्जनशीलता आणि नवनिर्मिती हे मूलमंत्र आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा आणि त्यांच्यातील कौशल्ये विकसित व्हावीत यासाठी विद्यापीठाने सेंटर फॉर क्रिएटिव्हिटी अँड स्किल डेव्हलपमेंट केंद्राची स्थापना केली आहे.विद्यापीठातर्फे संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून दिला जात आहे.’’ (प्रतिनिधी)४पत्रकारांशी बोलताना अदा इ. योनाथ म्हणाल्या, सध्याचे विद्यार्थी पायाभूत विज्ञानाकडे वळत नाही, अशी ओरड केली जाते. परंतु, त्यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही. तर विद्यार्थ्यांना संशोधनाकडे वळवणे गरजेचे आहे. त्यांच्यात लहानपणापासूनच संशोधक निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच एकाच विषयाचा अभ्यास करून उपयोग नाही, तर विद्यार्थ्यांनी आंतरविद्याशाखीय अभ्यास करायला हवा.विद्यार्थ्यांनी नैतिक मूल्यांपासून दूर जाऊ नये. योग्य मार्ग स्वीकारून शिक्षण घ्यावे. आपल्या कर्तव्याचे पालन करावे, आई, वडील, शिक्षक, देश यांना परमेश्वराप्रमाणे पूजनीय मानावे.- डॉ. पतंगराव कदम