मुंबई : कमला मिल आग प्रकरणातील वन अबव्हच्या संचालकांपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. अशात त्यांना पकडण्यासाठी पोलिसांना त्यांचे फोटो जाहीर करून त्यांचा शोध घेणा-यांना एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्याची नामुष्की पोलिसांवर ओढावली आहे.कमला मिल आगप्रकरणी वन अबव्हचे संचालक क्रिपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजित मानकरसह व्यवस्थापकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेच्या दिवसांपासूनच तिघेही संचालक पसार झाले. परदेशी पळून जाऊ नये म्हणून त्यांच्याविरुद्ध लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली. मात्र आठवडा उलटत आला तरी या तिघांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आलेले नाही.अशात त्यांच्या शोधासाठी 1 लाखाचे बक्षीस जाहीर करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यांची माहिती देणा-यांना एक लाख रुपये देण्यात येणार आहे. या तिघांचे फोटो आणि त्यांची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अग्नितांडवाला दोन आठवडेही पूर्ण झाले नसताना 'वन अबव्ह'च्या मालकांना नवीन ठिकाणी नवा संसार थाटायला सुरुवात केली आहे. नुकताच 'वन अबव्ह'च्या मालकांनी वांद्रे कुर्ला कॉम्पेक्स (बीकेसी)मध्ये पबसाठी नव्या जागेचा ताबा घेतला आहे. बीकेसीच्या प्रमुख जागेत या पबला जागा मिळाल्याचं वृत्त गेल्या काही दिवसांपूर्वी फर्स्टपोस्टने दिलं होतं. बीकेसीमध्ये अनेक कंपन्यांचे ऑफिस आहेत. त्यामुळेच अनेक हॉटेल व बार बीकेसीमध्ये संसार थाटू पाहत आहेत.'वन अबव्ह'चे मालक क्रिपेश संघवी आणि जिगर संघवी यांनी डिसेंबर 2017मध्ये बीकेसीतील जागेच्या करारावर सह्या केल्या असून एप्रिल 2018पर्यंत बीकेसीत 'वन अबव्ह'चा डोलारा पुन्हा सुरू करण्याचं नियोजन असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. बीकेसीतील ट्रेड सेंटर बिल्डिंगच्या तळ मजल्यावर 10 हजार स्क्वेअर फूट जागेत 'वन अबव्ह' नव्याने सुरू करण्याचं काम सुरू होणार आहे. कमला मिल्समध्ये वन अबव्हचं इंटिरिअर ज्या कंपनीने केलं होतं तीचं कंपनी बीकेसीमध्येही इंटिरिअरचं काम पाहणार आहे. वन अबव्हच्या मालकांनी मुंबई महापालिकेकडे नव्या पब उभारणी संदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला असल्याचीही माहिती मिळते आहे. दरम्यान, एच/इस्ट वॉर्ड अधिकाऱ्याच्या माहितीनुसार,कमला मिल्समधील दुर्घटना लक्षात घेता एप्रिल 2018पर्यंत वन अबव्हला बीकेसीमध्ये पुन्हा पब सुरू करायला मंजुरी मिळणार नाही. मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता सध्या कमला मिल्समध्ये लागलेल्या आगीसंदर्भातील चौकशी करत असून येत्या एक महिन्यात ही चौकशी पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.