लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या, दहावी-बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षा जुलै-आॅगस्ट महिन्यांत घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र संकेतस्थळावरून डाउनलोड करून घ्यायची आहेत. प्रवेशपत्राची प्रिंट आउट देण्यात येणार नसल्याचे मंडळाने जाहीर केले आहे. मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झालेले अथवा ज्या विद्यार्थ्यांना गुण वाढविण्यासाठी परीक्षा द्यायची आहे, त्यांची परीक्षा आॅक्टोबर महिन्यात घेतली जात असे, पण गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष फुकट जाऊ नये, म्हणून ही परीक्षा जुलै-आॅगस्ट महिन्यात घेण्यात येते. १२वीची फेरपरीक्षा ११ जुलैपासून सुरू होईल. जुलै-आॅगस्ट महिन्यात होणाऱ्या परीक्षांसाठी मंडळातर्फे छापील प्रवेशपत्र देण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्याऐवजी संकेतस्थळावर प्रवेशपत्र उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांची आॅनलाइन आवेदनपत्र स्वीकारण्याची प्रक्रिया संपत आली आहे. त्यामुळे आता परीक्षांची तयारी सुरू आहे. कनिष्ठ महाविद्यालय आणि माध्यमिक शाळांना शिक्षण मंडळाने आवाहन केले आहे की, विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र आॅनलाइन पद्धतीने लॉगइनमधून डाउनलोड करून घ्यावीत, तसेच विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र स्वाक्षरी आणि शिक्क्यासह विद्यार्थ्यांना देण्यात यावीत, असे माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांना मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.
प्रवेशपत्र मिळणार आॅनलाइन
By admin | Published: July 08, 2017 4:05 AM