मुंबई : आपल्याला कोरोनाचा शेवट करायचा आहे. त्यासाठी सज्ज व्हा, कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केले. युद्धकालीन परिस्थितीत आपण १५ दिवसांत बीकेसीतील केंद्र उभारले. आज हे केंद्र ओस पडले आहे, ते असेच राहो, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली.कोरोनावरील लसीकरण मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री ठाकरे यांनी वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड लसीकरण केंद्रापासून केला. या कार्यक्रमाला पर्यटन व मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, आमदार झीशान सिद्दिकी, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी, टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित आदी उपस्थित होते.ते दिवस आठवले तरी अंगावर काटा येताे. रुग्णालये एप्रिल ते जुलैपर्यंत पावसाने नव्हे तर कोरोना रुग्णांनी वाहत होती. पालिका आयुक्त, डॉक्टर, परिचारिका यांनी त्याही परिस्थितीत लाखो लोकांचे प्राण वाचवले. या कोरोना योद्ध्यांना माझा मानाचा मुजरा, असे मुख्यमंत्री म्हणाले. केंद्राच्या आरोग्य विभागाने चाचणी करूनच लसीचे वितरण केले. त्यामुळे लसीबाबत संशय घेण्याचे कारण नाही, असेहीत्यांनी स्पष्ट केले.
लस वाटपावरून राजकारण नको -महाराष्ट्र राज्याच्या तुलनेत पश्चिम बंगालला कोरोना लसीचा अधिक साठा देण्यात आला आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता, मुख्यमंत्री या नात्याने राज्याचे सर्व नागरिक मला सारखेच आहेत. तसेच, देशातील सर्व नागरिक हे पंतप्रधानांना सारखेच आहेत अथवा असावेत. त्यामुळे कोरोना लस कोणाला कमी, कोणाला जास्त दिली, याबाबत राजकारण नको, असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.लस मोफत देणे केंद्राच्या निर्णयावर अवलंबून -केंद्र सरकारच्या निर्देशानुसार प्रथम कोरोनायोद्ध्यांना मोफत लस देण्यात येत आहे. अन्यथा मी देखील लस घेतली असती. केंद्र सरकार मोफत लसीबाबत काय निर्णय घेणार, हे समोर आले की, राज्य सरकार आपला निर्णय घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
लवकरच लसींचा साठा वाढेलआणखी दोन - तीन कंपन्या लसीची चाचणी करत आहेत. त्यामुळे लवकरच लसींचा साठा वाढेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.आम्ही लस घेतली, तुम्हीही निर्धास्तपणे घ्याकोरोनाची पहिली लस मला मिळाली, याचा खूप आनंद होत आहे. मला लस घेताना कोणतीही भीती वाटली नाही. लस घेतल्यानंतरही कोणता त्रास जाणवला नाही. माझी प्रकृती उत्तम आहे. लस घेतल्यानंतरही योग्य आहार घ्या आणि सुरक्षित रहा. - डॉ. मधुरा पाटील (वांद्रे-कुर्ला संकुलातील केंद्रात पाच महिन्यांपासून आहारतज्ज्ञ)
या ऐतिहासिक क्षणी पहिल्याच यादीत माझे नाव आल्यामुळे मला खूप आनंद होत आहे. सकाळी साडेसहा वाजता मला पालिकेचा एसएमएस आला. त्यानुसार मी लगेच वांद्रे-कुर्ला संकुलात आलो. गेले दहा महिने आपण कोरोनाचा सामना करीत आहोत. मग आता लस घेण्याबाबत भीती कशाला बाळगता? लस घेण्यासाठी बिनधास्त या. - डॉ. सचिन जैन (हिंदुजा रुग्णालय, खार)
लस घेतल्यानंतरही मला कोणताही त्रास जाणवला नाही. मी अगदी ठणठणीत असून आता कामावरही रुजू होत आहे.- डॉ. जवाहर पंजवाणी (खासगी दवाखाना)
सर्वांनी ही लस घ्यावी. त्यानंतरच लसीबाबतची शंका दूर होईल. संपूर्ण देश कोरोनमुक्त होऊ शकेल. - डॉ. हरीश शेट्टी (हिरानंदानी रुग्णालय)