मुंबई : केंद्र व महाराष्ट्रातील सरकार नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात सर्व स्तरांवर अपयशी ठरले आहे. वैयक्तिक ‘अजेंडा’ राबवून देशातील राष्ट्रीय एकात्मता व शांतता धोक्यात घालण्याचे काम सरकार करत असून, त्यांच्याविरुद्ध संघर्षासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे प्रतिपादन राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केले.माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र आणि मुंबई प्रदेश काँग्रेसच्या वतीने शनिवारी झालेल्या राष्ट्रीय युवक काँग्रेस मेळाव्यात गुलाम नबी आझाद हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा ब्रार, राजस्थान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे प्रमुख उपस्थित होते.तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री पतंगराव कदम, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि पक्षाचे आमदार, पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.‘राजीव गांधींच्या धोरणांची आज देशाला गरज’राजीव गांधी यांच्या आठवणींना उजाळा देत गुलाम नबी आझाद म्हणाले, राष्ट्राच्या उभारणीत राजीव यांनी मोलाचा हातभार लावला. तरुणांना एकत्र करत संधी देण्याचे धोरण त्यांनी राबवले. सध्याचे सरकार मात्र तरुणाईच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. विकासकामांऐवजी पक्षाचा वैयक्तिक ‘अजेंडा’ राबवून देशातील राष्ट्रीय एकात्मता व शांतता धोक्यात घालण्याचे काम सरकार करत आहे. याविरुद्ध सर्वांनी संघटितपणे आवाज उठवावा. तर, राजीव गांधी यांनी राष्ट्राची उभारणी करतानाच सर्वसामान्य माणसांचाही तेवढ्याच तळमळीने विचार केला. आपणही त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत त्यांचे धोरण राबवण्याची गरज आहे, असे मत सचिन पायलट यांनी व्यक्त केले. या वेळी अमरिंदर सिंग राजा ब्रार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजीत कदम आदींची भाषणे झाली.
कुचकामी सरकारविरोधी संघर्षासाठी सज्ज व्हा!
By admin | Published: August 21, 2016 2:04 AM