पुणे : राज्यातील कोणत्याही भागात साथरोगाचे रुग्ण आढळल्यास त्याची ‘रिअल टाईम’ माहिती आरोग्य विभागाला मिळणार आहे. विविध आजारांच्या माहितीच्या आधारे साथरोगाच्या उद्रेकाचा इशारा देणारी ही संगणकीय प्रणाली राज्यात पुढील महिनाभरात कार्यान्वित होईल. त्यामुळे साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे शक्य होणार आहे. एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन व्यासपीठ (आयएचआयपी) अंतर्गत ही प्रणाली सुरू केली जाणार असून महाराष्ट्र देशातील नववे राज्य ठरले आहे. केंद्र सरकार व जागतिक आरोग्य संघटनेने संयुक्तपणे ‘आयएचआयपी’ हे व्यासपीठ विकसित केले आहे. देशात नोव्हेंबर २०१८ पासून टप्याटप्याने काही राज्यांमध्ये याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातही ही प्रणाली सुरू करण्यासाठी काही दिवसांपासून तालुका, जिल्हापातळीवर कर्मचारी, अधिकाºयांचे प्रशिक्षण सुरू होते. हे प्रशिक्षण नुकतेच पुर्ण झाले आहे. तसेच नुकतेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास यांच्या हस्ते पुण्यात ‘आयएचआयपी’चे आॅनलाईन पध्दतीने उदघाटन झाले. यावेळी आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील, राष्ट्रीय रोग नियंत्रण संस्थेचे डॉ. संकेत कुलकर्णी, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. देवांग जरीवाला, सहसंचालक डॉ. प्रकाश भोई आणि राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे उपस्थित होते. या प्रणालीचे संनियंत्रण पुण्यातील कार्यालयातून होणार आहे. साथरोगांमध्ये जलजन्य, कीटकजन्य, लसीकरण न केल्यामुळे होणारे आणि इतर असे एकुण चार प्रकारांमध्ये ३३ आजारांचा समावेश आहे. साथ रोग नियंत्रणासाठी देशभरात एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम सुरू असून आतापर्यंत या कार्यक्रमाद्वारे साथरोगांची माहिती साप्ताहिक स्वरूपात संकलित केली जात होती. ‘आयएचआयपी’ या संगणकीय प्रणालीमुळे आता ही माहिती रिअल टाईम मिळणार आहे. राज्यात पुढील महिनाभरात ही प्रणाली कार्यान्वित होणार आहे. साथरोगविषयक माहिती भौगोलिक स्थानानुसार भरली जात असल्याने उद्रेकग्रस्त भाग ओळखणे सहज शक्य होणार आहे. विविध आजारांच्या माहितीच्या आधारे संशयित उद्रेकाच्या सतर्कतेचे इशारे अधिकाºयांच्या थेट मोबाईलवर या प्रणालीद्वारे मिळणार आहेत. त्यामुळे तातडीने उपाययोजना करणे शक्य होईल, असे डॉ. आवटे यांनी सांगितले.--------------अशी मिळेल ‘रिअल टाईम’ माहिती संगणकीय प्रणाली तीन पातळ््यांवर काम करणार आहे. पहिल्या टप्प्यात गाव पातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रुग्णांची माहिती तेथील आरोग्य सेवकांकडून ‘एस’ फॉर्म (संशयित) मध्ये भरली जाईल. त्यांच्यासाठी मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात तालुका पातळीवरील सरकारी रुग्णालये, आरोग्य केंद्रांमधील रुग्णांची माहिती (पी फॉर्म) संगणकाद्वारे भरली जाईल. तर तिसऱ्या टप्प्यात सरकारी प्रयोगशाळांमध्ये नमुना तपासणीनंतरच्या निदानाची माहिती (एल फॉर्म) संगणकाद्वारे भरली जाईल. हे तिनही फॉर्म एकमेकांशी जोडण्यात आले आहेत. गावपातळीवर भरलेली माहिती सर्व सरकारी रुग्णालये, प्रयोगशाळांना पाहता येऊ शकते.
..............
प्रणालीचे फायदे- राज्याच्या कोणत्याही विशिष्ट भागातील साथरोगनिहाय रुग्णांची माहिती मिळणार- साथरोगाच्या उद्रेक दर्शविण्यासाठी रुग्णांची कमाल पातळी निश्चित करण्यात आली आहे. त्यापुढे संख्या गेल्यास संगणकाद्वारे आपोआप इशारा देणारा संदेश अधिकाºयांना जाईल. - संदेश मिळाल्यानंतर विशिष्य भौगोलिक स्थानानुसार उपाययोजना करणे शक्य- कोणत्याही साथरोग आजाराच्या रुग्णांची सर्वप्रकारची माहिती एका क्लिकवर मिळणार- स्त्री-पुरूष, वयोगट, आजारानुसार, भौगोलिक स्थानानुसार माहिती विश्लेषण करणे शक्य
.......................
राज्यामध्ये पहिल्या टप्प्यात केवळ ग्रामीण भागामधील सरकारी आरोग्य यंत्रणेमध्ये ही प्रणाली राबविली जाणार आहे. त्यानंतर टप्याटप्यााने शहरी भागातील सरकारी रुग्णालयांचा समावेश केला जाईल. शेवटच्या टप्प्यात खासगी रुग्णालयांनाही या प्रणालीत समाविष्ट केले जाणार आहे. सध्या राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालये, अधिकारी, डॉक्टर्स यांची माहिती भरण्याचे काम सुरू आहे. हे काम पुर्ण झाल्यानंतर महिनाभरात ही प्रणाली सुरू होईल.डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य विभाग