लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जेवढी झाडे कापण्यात येणार तेवढी झाडे प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर त्याच परिसरात लावण्यात येतील, अशी हमी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) दिल्यानंतर उच्च न्यायालयाने मेट्रो-३ प्रकल्पासाठी वृक्षतोडीवर दिलेली स्थगिती शुक्रवारी उठवली.मेट्रो- ३ प्रकल्पासाठी वृक्षतोड करण्यास उच्च न्यायालयाने ९ फेब्रुवारीला स्थगिती दिली होती. यामुळे मेट्रो-३ प्रकल्पाचे काम पूर्णपणे थांबले होते. ‘पर्यावरण व विकास यांचे संतुलन राखण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे. याचिकाकर्त्यांनी घेतलेली कठोर भूमिका स्वीकारली तर विकास करणे अशक्य होईल. मेट्रो धावू लागल्यानंतर नागरिकांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारेल,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पासाठी एमएमआरसीएल सुमारे ५००० झाडांची कत्तल करणार असल्याने चर्चगेट व कफ परेडच्या काही रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर उच्च न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवले. तथापि, एमएमआरसीएल दिलेले आश्वासन पाळणार आहे की नाही, हे पाहण्यासाठी न्यायालयाने महाराष्ट्र विधिसेवेचे सचिव व उच्च न्यायालयाच्या उपनिबंधकांची नियुक्ती केली. ‘यासंदर्भातील अहवाल आम्ही नियुक्त करू त्या समितीपुढे ते दरमहा सादर करतील. ही समिती उच्च न्यायालयाच्या दोन विद्यमान न्यायाधीशांची असेल,’ असे न्यायालयाने स्पष्ट केले. स्थगिती हटवल्याने याचिकाकर्त्यांनी या आदेशावर स्थगिती देण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली. त्यावर १0 दिवसांची स्थगिती दिली.
मेट्रो-३चा मार्ग मोकळा
By admin | Published: May 06, 2017 4:34 AM