पुणे : पत्रावरचा पत्ता चुकीच्या ठिकाणी लिहिण्याची साधी चूक, पण ती पत्र पाठविणाऱ्याला व ते स्विकारणाऱ्या टपाल खात्यालाही धडा देऊन गेली. पत्र पाठविणाऱ्याला टपाल खात्याने त्यासाठीचे शुल्क परत दिले तर तक्रार करणाऱ्या ग्राहकालाही त्याने पाठविलेले पत्र पुन्हा त्यालाच स्विकारावे लागले.यापुढे पत्ता कुठे लिहावा याबाबत मार्गदर्शन केले गेले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीने टपाल खात्याला दिला आहे. प्रकाश लडकत यांनी टिळक रस्ता टपाल कार्यालयात त्यांचे एक पत्र स्पिड पोस्टने पाठविण्यासाठी म्हणून दिले होते. त्यासाठीचे ४० रूपये शुल्कही त्यांनी दिले. हे पत्र त्यांनी जिथे पाठविले तिथे न जाता काही दिवसांनी परत त्यांनाच मिळाले. याबाबत त्यांनी अ. भा. ग्राहक संरक्षण समितीकडे तक्रार केली. समितीने टपाल कार्यालयाला याबाबत कळविल्यानंतर त्यांनी लडकत यांचे शुल्क त्यांना परत करण्याचे मान्य केले.मात्र विषय तिथेच न संपता समितीचे पदाधिकारी महेंद्र दलालकर यांनी याचा शोध घेतला त्या वेळी पोस्टाने पत्र पाठविण्याचे अनेक नियम असल्याचे त्यांच्या लक्षात आले. टपाल अधिनियम २६ नुसार पत्र पाठविणाऱ्याचा पत्ता पाकिटाच्या डाव्या किंवा मागच्या बाजूला लिहावा. तसेच पत्र स्वीकारणाऱ्याचा नाव, पत्ता पाकिटाच्या उजव्या बाजूला लिहावा. पाकिटाच्या मधोमध वरून ३ से. मी. अंतर तिकिटे इत्यादी लावण्याकरिता सोडणे बंधनकारक आहे. आंदोलनाचा इशारायाशिवाय या सगळ्या नियमांची माहिती टपाल खात्याने कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावणेही आवश्यक आहे. अशी माहिती कोणत्याही टपाल कार्यालयात लावलेली नसते, असे समितीच्या लक्षात आले. त्यामुळे आता दलालकर यांनी अशी माहिती फलक स्वरूपात तत्काळ सर्व कार्यालयांमध्ये लावण्याची मागणी टपाल खात्याकडे केली आहे. त्याची दखल घेतली नाही तर समितीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
पाठविणाऱ्याला व पोस्टालाही मिळाला धडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2016 1:18 AM