मुंबई : महाराष्ट्रातील विविध भागात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असेल आणि नुकसान भरपाई मिळवायची असेल, तर नुकसानीच्या ७२ तास म्हणजे तीन दिवसांच्या आत तक्रार करणे आवश्यक असते. अन्यथा भरपाईमधून वगळण्यात येते.
ऑनलाइन तक्रार अशी नोंदवा- प्ले स्टोअरवरून क्रॉप इन्शुरन्स (Crop Insurance) नावाचे ॲप मोबाइलमध्ये डाऊनलोड करून चार पर्यायांपैकी तीन नंबरचा पर्याय ‘नोंदणी खात्याशिवाय खाते सुरू ठेवा’ हा पर्याय निवडावा. - त्यानंतर पाच प्रकारचे पर्याय आपल्यासमोर येतील. त्यातील ‘पीक नुकसान’ हा पर्याय निवडावा. त्यानंतर पीक नुकसानीची पूर्वसूचना आणि पीक नुकसान सद्यस्थिती असे दोन पर्याय येतील. त्यातील ‘पीक नुकसानीची पूर्वसूचना’ हा पर्याय निवडावा.- त्यानंतर मोबाइल क्रमांक भरून त्यावरील ओटीपी टाकून सबमिट करा. त्यानंतर हंगाम, वर्ष, योजना, राज्य अशी माहिती भरा.- ‘नोंदणीचा स्रोत’ या रकान्यामध्ये विम्याचा फॉर्म कुठून भरला त्याची माहिती भरणे आवश्यक आहे. विमा पॉलिसी क्रमांक भरा. विम्याची संपूर्ण माहिती दिसेल. त्यानंतर कोणत्या पिकाचे नुकसान झाले आहे ते निवडा.- आता फोनवरील लोकेशनचे ॲक्सेस ॲपला देऊन, तपशीलामध्ये घटनेचा प्रकार, दिनांक, वेळेसह पीक वाढीचा टप्पा, नुकसानीची संभाव्य टक्केवारी, फोटो, व्हिडीओ अशी माहिती भरून ‘सादर करा’ या बटणावर क्लिक करा. त्यानंतर जो डॉकेट आयडी नंबर येईल तो जपून ठेवा. त्याचबरोबर - नुकसानीची माहिती आपल्या गावातील तलाठ्यालासुद्धा देणे आवश्यक आहे.