Aditya Thackeray ( Marathi News ) : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशात चुरशीचं चित्र पाहायला मिळालं. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या ६० हून अधिक जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी भाजपला आपल्या मित्रपक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे. अशा स्थितीत १८ जागा मिळावलेल्या टीडीपी आणि १२ जागा मिळवलेल्या जेडीयू या एनडीएतील दोन घटकपक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या इंडिया आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी टीडीपीला आणि जेडीयूला आवाहन करत लोकसभेचं अध्यक्षपद तुमच्याकडे मिळवावं, असं आवाहन केलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "भाजपला समर्थन देऊ इच्छिणाऱ्या संभाव्य मित्रपक्षांना माझी एक नम्र विनंती आहे. लोकसभा अध्यक्षपद तुमच्याकडे घ्या. कारण भाजपच्या डावपेचांचा आम्हाला अनुभव आहे. ज्या क्षणी ते तुमच्या मदतीने सरकार स्थापन करतील, तेव्हाच ते तुम्हाला दिलेला शब्द मोडतील आणि तुमचा पक्षही फोडण्याचा प्रयत्न करतील," असं म्हणत आदित्य यांनी एनडीएतील पक्षांना सावध केलं आहे.
जेडीयू-टीडीपी कोणती खाती मागणार?
केंद्रात सत्तास्थापनेच्या तयारीत असलेल्या एनडीएतील घटक पक्षांना दिली जाणारे मंत्रिपदे व त्यांच्या पसंतीचे मंत्रालयाबाबत गुरुवारी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यात याबाबत प्रदीर्घ बैठक झाली. बैठकीला केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष आणि विनोद तावडे यांनाही बोलावण्यात आले होते. तेलुगू देसम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभा अध्यक्षपदासह आयटी, दूरसंचार, ग्रामविकास आणि जलशक्ती आदी मलईदार मंत्रालयांची मागणी केली आहे. याशिवाय आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचीही त्यांची मागणी आहे. चंद्राबाबूंना लोकसभा अध्यक्षपदासह किमान तीन मंत्रिपदे हवी आहेत. जदयुचे नेते नितीश कुमार यांनी रेल्वे, कृषी आणि अर्थराज्यमंत्री अशी तीन मंत्रिपदे मागितली आहेत. शिंदेसेनेनेही एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदाची मागणी केली आहे.