नम्रता फडणीस- पुणे : ‘किरवंत,’ ‘छावणी,’ ‘देवनवरी,’ शुद्ध बीजापोटी’ यांसारख्या नाट्यसंमेलनाध्यक्ष डॉ. प्रेमानंद गज्वी यांच्या दर्जेदार कलाकृतींच्या मालिकेमध्ये आता आणखी एका ‘हटके’ नाटकाची भर पडणार आहे. ते म्हणजे ‘कळीबंद पाऊस.’ खरे तर या शीर्षकातच नाटकाचे संपूर्ण सार दडलेले आहे. ‘मासिक पाळी’ या विषयावर अनेक लघुपटांसह हिंदीत ‘पॅडमॅन’सारखा चित्रपटही आला. मात्र महिलांच्या मासिकचक्रावर नाटक लिहिण्याचा विचार एकाही नाटककारांच्या मनाला ‘शिवला’ नाही. परंतु सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत समाजातील विदारक सत्य मांडण्याची हातोटी असलेल्या डॉ. गज्वी यांनी महिलांशी निगडित अशा अत्यंत संवेदनशील विषयावर लेखन करण्याचे धाडस केले आहे. लवकरच हे नाटक पुस्तकरूपात वाचकांच्या भेटीला येणार आहे. ‘मासिक पाळी’ या विषयावर अजूनही विशेषत: ग्रामीण भागातील महिलांमध्ये खुलेपणाने चर्चा होत नाहीत. अशा परिस्थितीत नाटकाच्या माध्यमातून मुलींचे वयात येणे, त्यांच्यात होणारे शारीरिक बदल या नैसर्गिक क्रियेकडे पाहण्याचा कुटुंबांचा दृष्टिकोन यावर डॉ. गज्वी यांनी लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला आहे. या नाटकाविषयी डॉ. गज्वी यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. ते म्हणाले, की मी नेहमीच वेगळ्या विषयांच्या शोधात असतो. एखादा विषय डोक्यात आला, की माझ्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात आणि मी त्याची उत्तरे गवसण्याच्या मागावर लागतो. ग्रामीण भागात मुलीला पाळी आली, की ‘कावळा शिवला का?’ असा शब्दप्रयोग प्रयोग करून तिला लांब बसवले जाते. शहरी भागात हे चित्र फारसे दिसत नाही. पण मुलीला जेव्हा पहिल्यांदा पाळी येते तेव्हा तिची ओटी भरली जाते. तिच्यासाठी सगळेच नवीन असते. तिच्यात अनेक शारीरिक बदल घडत असतात. तिच्या वयात येण्यामुळे आई-वडिलांना येणारे दडपण, त्यांच्या मनात सुरू झालेले विचारचक्र असा सगळ्यांचा परामर्श नाटकात घेण्यात आला आहे. या विषयावर कुटुंब आणि समाजाचे प्रबोधन व्हावे, हा लेखनामागचा हेतू आहे. रंगभूमीवर असा प्रयोग अद्यापही कुणी केलेला नाही. पहिल्यांदाच असा विषय नाटकाच्या माध्यमातून मांडला जात आहे. या नाटकाची मूळ संहिता तयार झाली आहे. ..........सध्या या नाटकाच्या अभिवाचनातून हा विषय लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. लवकरच नाटक पुस्तकरूपात आणण्याचा मानस आहे. माझी नाटके नेहमीच वेगळ्या धाटणीची राहिली आहेत. हा विषय प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवरदेखील आणता येणे शक्य आहे, असे गज्वी म्हणाले.
‘मासिक पाळी’ विषयावर गज्वी यांचे नवे नाटक ‘कळीबंद पाऊस’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 12:31 PM
महिलांच्या मासिकचक्रावर नाटक लिहिण्याचा विचार एकाही नाटककारांच्या मनाला ‘शिवला’ नाही...
ठळक मुद्देलवकरच हे नाटक पुस्तकरूपात वाचकांच्या भेटीला येणार ‘मासिक पाळी’ या विषयावर अनेक लघुपटांसह हिंदीत ‘पॅडमॅन’सारखा चित्रपटसध्या या नाटकाच्या अभिवाचनातून हा विषय लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने पाऊल