- मोसीन शेख
मुंबई: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला असून, शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत केली. यानंतर वेगवगेळ्या प्रतिक्रिया येत आहेत. तर "ठाकरे सरकराने केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय असल्याची" प्रतिक्रिया 'छोटा पुढारी' म्हणजेच घनश्याम दरोडे यांनी दिली आहे. लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी तो बोलत होता.
मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणून प्रसिद्ध असलेला अहमदनगरमधील घनश्याम दरोडे म्हणजेच 'छोटा पुढारी' शेतकऱ्यांचा प्रश्नावर पोट तिडकीने बोलत असल्याचे नेहमीच पाहायला मिळाले आहे. त्यामुळे राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकराने केलेल्या कर्जमाफीबाबत घनश्याम दरोडे याने ठाकरे सरकारचे आभार मानले आहे. मात्र याच बरोबर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी सुद्धा त्याने यावेळी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 लाखांपर्यंतची कर्जमाफीबद्दल घेतलेला निर्णय दिलासादायक असून याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होणार आहे. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी 10 रुपयात पोटभर जेवणाचा दिलेला शब्द सुद्धा पाळण्याच्या दिशेन त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे याचा फायदा सुद्धा भविष्यात शेतकऱ्यांना होणार आहे. तर उद्धव ठाकरेंच्या सरकारने पुढेही असेच काम करावे असेही घनश्याम म्हणाला.
विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांनी 25 हजाराची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली असल्याच्या प्रश्नावर बोलताना घनश्याम म्हणाला की, उद्धव ठाकरे हे दिलेला शब्द पाळणारे व्यक्ती आहे. त्यामुळे नक्कीच ते शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतली ही अपेक्षा आहे. मात्र त्यांनी सातबारा कोरा करण्याचा जो शब्द दिला होता, तो त्यांनी पाळायला हवे असेही घनश्याम म्हणाला.
फडणवीस सरकारची कर्जमाफी फसवी ठरली!
या आधीच्या फडणवीस सरकराने शेतकरी कर्जमाफीची फक्त घोषणा केली. प्रत्यक्षात मात्र कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळालाच नाही. त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली असली तरीही शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमाफी झालीच नाही. तर भाजपच्या सरकराने केलेल्या कर्जमाफीमुळे ठरावीक शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळाला. फडणवीसांनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना जो शब्द दिला होता, तो त्यांनी पाच वर्षात पाळला नसल्याचं सुद्धा यावेळी घनश्याम म्हणाला.