दीप्ती देशमुख, मुंबईएखाद्या खासदार, आमदारालाही लाजवेल एवढ्या धनाढ्य व्यावसायिकाला भाजपाने महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. भाजपाने ‘एन’ वॉर्डमध्ये पराग शहा या व्यावसायिकाला प्रभाग क्रमांक १३२मधून उमदेवारी देत नवाच पायंडा रचला आहे. शहा यांची एकूण मालमत्ता ६८९ कोटी ९५ लाख २ हजार ३२७ रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे एकाही बँकेचे किंवा अन्य कोणाचेही कर्ज त्यांच्यावर नसल्याचे निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे निदर्शनास आले आहे. गडगंज संपत्तीमुळे शहा यांच्याकडे भाजपाचा ‘रईस’ उमेदवार म्हणून पाहिले जात आहे.
आत्तापर्यंत भाजपा गुंडांनाच प्रवेश देत असल्याची बोंब मारण्यात येत होती. मात्र भाजपाने आता तर चक्क एका अब्जाधीशालाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. व्यवसायाने प्रमोटर असलेल्या शहा यांची संपत्ती पाहून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भाजपाने शहा यांना घाटकोपरच्या प्रभाग क्रमांक १३२मधून निवडणूक लढविण्यासाठी तिकीट दिले आहे. या प्रभागात सोमय्या महाविद्यालय, गारोडिया नगर, ओएनजीसी कॉलनी आणि राजावाडी रुग्णालयाच्या भोवतालच्या परिसराचा समावेश आहे. या प्रभागात गुजराती समाज बहुसंख्य असल्याने भाजपाने पराग शहा यांना तिकीट देणे पसंत केले. प्रभाग १३२ खुला असल्याने या ठिकाणी शिवसेनेचे सुधाकर पाटील तर काँग्रेसचे प्रवीण छेडा यांच्याशी शहा यांना टक्कर द्यावी लागणार आहे.
विशेषत: छेडांकडून त्यांचा प्रभाग खेचून घेण्यात शहा यांना यश येते का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. शहा (४७) व्यवसायिक असून, त्यांच्या नावावर ३९१ कोटी २१ लाख ५५ हजार १८० रुपये, पत्नीच्या नावावर २३८ कोटी ८० लाख ७१ हजार ३६५ रुपये आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या एका व्यक्तीच्या नावावर ४० कोटी ५४ लाख ७५ हजार २८२ रुपयांची मालमत्ता आहे. त्यामध्ये नऊ कृषी जमिनी, दोन अकृषी जमिनी, तीन निवासी इमारती, चार व्यापारी इमारती आणि पाच सदनिकांचा समावेश आहे. शहा हे मुंबईतील सर्वांत श्रीमंत उमेदवार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहा यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ कोटी ३८ लाख ४१ हजार ५४० रुपये- कुटुंबाची जंगम मालमत्ता : ६७० कोटी ५७ लाख १ हजार ८२७ कोटी रुपये- कुटुंबाची स्थावर मालमत्ता : १९ कोटी ३८ लाख ५०० रुपये- शहा हे एक व्यवसायिक असून, त्यांच्यावर काहीही कर्ज नाही.‘एन’ वॉर्डमधील अन्य कोट्यधीश उमेदवारशिवसेनेने प्रभाग क्रमांक १२६मधून स्वाती शितप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची व त्यांच्या कुटुंबाची एकूण २६ कोटी ७ हजार २०४ रुपयांची मालमत्ता आहे. काँग्रेसचे प्रवीण छेडा यांची एकूण १४ कोटी ४ लाख ६४ हजार ५७५ रुपयांची संपत्ती आहे. त्यात त्यांच्या कुटुंबाच्या संपत्तीचाही समावेश आहे. १३१ प्रभागातून उमेदवारी मिळालेल्या काँग्रेसच्या राखी जाधव यांची व कुटुंबाची एकूण ७ कोटी ३२ लाख ५९ हजार एक रुपये इतकी मालमत्ता आहे.विजय शेट्टी यांची २१ कोटी ३६ लाख ८७ हजार २०७ रुपये इतकी संपत्ती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे १२३ प्रभागातून उमेदवारी मिळालेल्या स्नेहलता बोंदर्डे यांची एकूण संपत्ती १२ कोटी ८१ लाख रुपये आहे.