मुंबई - महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या बंगल्यांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका करण्यास सुरुवात केली आहे. टीका करणाऱ्यांमध्ये आता नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांचे नावही सामील झाले आहे.
'आग लागी बस्ती में, सरकार अपनी मस्ती मे', असं म्हणत निलेश राणे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका केली आहे. राज्याची आर्थिक स्थिती खराब असल्याचे सरकारकडूनच अनेकदा सांगण्यात आले आहे. अशा स्थितीत मंत्र्यांच्या बंगल्यांच्या सजावटीसाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात येत असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे.
मंत्र्यांच्या 31 बंगल्यांसाठी एकूण 15 कोटी रुपये खर्च होणार आहेत. यापैकी छगन भुजबळ आणि काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यांवर सर्वाधिक खर्च होणार आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी देखील 92 लाख रुपये खर्च येणार असल्याचे समजते.
राज्याची स्थिती खराब असताना सरकारला उधळपट्टी करण्याची मस्ती आल्याची घणाघाती टीका निलेश राणे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. त्याला सत्ताधाऱ्याकडून काय प्रत्युत्तर मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. निलेश राणे नेहमीच सत्ताधऱ्यांवर ट्विटरच्या माध्यमातून टीका करताना दिसतात.