पुणे : घोरपडी येथील रेल्वे उड्डाणपुलाचा प्रकल्प संरक्षण मंत्रालयाने मंजूर केल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज येथे नमूद केले. हा प्रकल्प पुढे पुणे महानगरपालिकेकेडे अंमलबजावणीसाठी पाठविल्याचे त्यांनी सांगितले. पर्रिकर यांनी पुणे कँटोन्मेंटच्या स्वच्छताविषयक प्रकल्पांची पाहणी केली. बुट्टी स्ट्रीट येथील मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प तसेच हडपसर येथील नियोजित कचरा डेपोचा त्यात समावेश होता. तसेच कँटोन्मेंट बोर्डाने गांधी जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या स्वच्छ भारत अभियानात सहभाग घेतला. तसेच त्यांनी अखिल भारतीय दाऊदी बोहरा समाज संस्थेला, नवरात्र साजऱ्या करणाऱ्या एक मंदिरालाही भेट दिली.खासदार अनिल शिरोळे, सरंक्षण विभागाचे संचालक गीता पेरती, ए भास्कर, डिफेन्स इस्टेटचे संचालक के़ जे़ एस़ चौहान, बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर ए़ के़ त्यागी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ डी़ एऩ यादव, खडकी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप, देहूरोड बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप, पुणे बोर्डाचे उपाध्यक्ष दिलीप गिरमकर, सदस्य विनोद मथुरावाला, किरण मंत्री, अतुल गायकवाड, रूपाली बीडकर तसेच आदी त्यांच्यासमवेत होते. या वेळी पर्रिकर बोलत होते.एम. जी. रोडवरील कोहिनूर चौकात स्वच्छता अभियानात पर्रिकर सहभागी झाले. तिन्ही कँटोन्मेंटचे सदस्य, अधिकारी, विद्यार्थी, लष्करातील अधिकारी यांचा त्यात समावेश होता. बुट्टी स्ट्रीट येथील ३७ कोटी रुपये खर्चाच्या, २0 एमएलडी क्षमतेच्या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पास पर्रिकर यांनी भेट दिली. आगामी मे महिन्यात हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे.हडपसर येथील कचरा डेपो प्रकल्पाची पाहणी करुन पर्रिकर यांनी कचरा निर्मूलनाच्या गोवा पणजी मॉडेलनुसार हा प्रकल्प राबविण्याचे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)>संरक्षण मंत्रालयाकडून हिरवा कंदीलघोरपडी येथील रेल्वे क्रॉसिंगजवळ सतत वाहतूककोंडी होत असल्याने पुणे कँटोन्मेंट बोर्ड येथे उड्डाणपुलासाठी प्रयत्नशील होते. या पुलाच्या बांधकामासाठी दीर्घकाळ संरक्षण मंत्रालयाकडून परवानगी मिळविण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर मनोहर पर्रिकर यांच्या आजच्या वक्तव्यामुळे या पुलाच्या बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
घोरपडी रेल्वे उड्डाणपूल प्रकल्प मार्गी
By admin | Published: October 03, 2016 1:47 AM