ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - शिवसेनेच्या प्रखर विरोधानंतर प्रख्यात गझलगायक गुलाम अली खान यांचे भारतातील अनेक कार्यक्रम रद्द झालेले असतानाच 'घर वापसी' या चित्रपटातील एका गाण्याच्या निमित्ताने गुलाम अली पुन्हा मुंबईत उपस्थित राहण्याची शक्यता आहे. निर्माते- दिग्दर्शत सुहेब लियासी यांचा घर-वापसी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून त्यातील एका देशभक्तीपर गीताला गुलाम अली यांना आवाज दिला आहे. त्याच चित्रपटाच्या म्युझिक रिलीजचा कार्यक्रम २९ जानेवारी रोजी पार पडणार असून त्यासाठी गुलाम अली मुंबईत उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या चित्रपटात त्यांनी ' अपनी मिट्टी की खुशबू है रगों मे ये बसी हैं..' या गाण्याला आवाज दिला आहे.
पाकिस्तानमुळे भारतीय भूमीवर रक्ताचे सडे पडत असताना, आपले जवान शहीद होत असताना पाकिस्तानी कलाकार अथवा क्रिकेटपटूंना भारतीय भूमीवर येऊ देणे हा त्यांचा अपमान आहे असे सांगत शिवसेनेने गुलाम अली खान यांच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात खान यांचे पुणे, मुंबई येथे होणारे कार्यक्रमही रद्द झाले होते. त्यानंतर दिल्ली व पश्चिम बंगाल सरकारने त्यांना राज्यात कार्यक्रमांसाठी आमंत्रितही केले होते. मात्र ते कार्यक्रमही रद्द झाले.
एवढ्या सगळ्या घटनांनंतर आता चित्रपटाच्या म्युझिक रिलीजसाठी गुलाम अली मुंबईत येतात का आणि त्यावर शिवसेना काय भूमिका घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.