ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - ‘कल चौदहवीं की रात थी’, ‘ये दिल ये पागल दिल मेरा..’ आणि ‘हंगामा है क्यूँ बरपा...’ अशा एकाहून अनेक सरस गझला लोकप्रिय करणारे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील पटियाला घराण्याचे पाकिस्तानी गजल गायक गुलाम अली यांचा मुंबईतील २९ जानेवारी रोजी होणारा पुर्वनियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. शिवसेनेच्या विरोधामुळे हा कार्यक्रम रद्द केला असल्याचं समजते आहे.
२९ जानेवारीला गुलाम अली 'घर वापसी' या चित्रपटाच्या गाण्याच्या लॉन्चिगंच्या कार्यक्रमाला येणार होते. या चित्रपटात गुलाम अलींनी भूमिका केली असून एक देशभक्तीचं गाणंही म्हटलं असल्याचं सांगण्यात येत आहे.
गुलाम अली यांचा मुंबई दौरा रद्द झाल्यामुळे चित्रपटाच्या गाण्याचे लॉन्चिगं साध्या पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहीती चित्रपटाचे दिग्दर्शक शोएब इलियासी यांनी दिली. ते म्हणाले 'घर वापसी' या चित्रपटाच्या गाण्याचे लॉन्च करायला वीरा देसाई रोडवरील द क्लब इथे ग़ुलाम अली येणार होते पण चित्रपट सेनेच्या कार्यकर्त्यांनी स्थान प्रमुखांना भेटून ग़ुलाम अली यांच्या कार्यक्रमासाठी जागा द्यायला विरोध केला .
गेल्यावर्षी शिवसेनेच्या विरोधानंतर गुलाम अलींनी मुंबईतील आपला कार्यक्रम रद्ध केला होता व आपण मुंबईत पुन्हा कधीही येणार नसल्याचं त्यांनी सांगीतले होते. तर मागील काही दिवसापुर्वी गुडगावमधील कार्यक्रमात शिवसेनेने विरोध दर्शवला होता.
मध्यंतरी लखनौत महोत्सवादरम्यान गायनाची तयारी दर्शविली आसता शिवसेनेने आपले विरोधाचे शस्त्र उगारले होते. गुलाम अली यांची सुधींद्र कुलकर्णी यांच्यासारखीच गत व्हावी अशी उत्तर प्रदेश सरकारची इच्छा असल्यास त्यांना आमंत्रण द्यावे, अशी धमकी शिवसेने गुलाम अली यांना दिली होती. ३ डिसेंबर २०१५ च्या महोत्सवात गुलाम अली गाणार असल्याचे लखनौ प्रशासनाने जाहीर केल्यानंतर. जवान बलिदान देत असताना पाकिस्तानी गायकाच्या गझलांचा आस्वाद घ्यायचा हे आम्हाला मान्य नाही, असे सेनेचे प्रदेश अध्यक्ष अनिल सिंग यांनी सांगितले होते.