पुणेः अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर दाखल केलेला मानहानीचा दावा शुक्रवारी मागे घेतला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांच्या न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
गिरीश बापट यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात पुण्याच्या प्रथम वर्ग न्यायालयात फौजदारी दावा दाखल केला होता. वर्षभर हा खटला सुरु होता. मात्र या खटल्याच्या सुनावणीसाठी गिरीश बापट उपस्थित राहू शकत नव्हते. त्याच पार्श्वभूमीवर बापट यांनी स्वतःहून हा दावा मागे घेतला. शुक्रवारी सकाळी बापट आणि मलिक हे खटला मागे घेण्यासाठी न्यायालयात उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी खटला मागे घेण्यासाठी न्यायलायत अर्ज दाखल केला, आणि खटला मागे घेतला.नवाब मलिक यांनी १९ नोव्हेंबर 2015 रोजी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी बापट यांनी तूरडाळीचे निर्बंध शिथिल करून डाळ विकण्यास परवानगी देऊन दोन हजार कोटींचा घोटाळा केला. बापट हे भ्रष्टाचारी असल्याने त्यांना त्वरित मंत्रिपदावरून हटवावे,’ असे आरोप केले होते. हे वृत्त विविध वृत्तवाहिन्या आणि पुण्यातील दैनिकांमध्ये प्रसिद्ध झाले. त्यामुळे आपली बदनामी झाल्याचे बापट यांनी न्यायालयातील जबाबात म्हटले होते.
माल जप्त केला त्याची किंमत ५४० कोटी रुपये होती. त्यामध्ये तूरडाळ १४० कोटींची होती. बाँडवर जी डाळ पुन्हा बाजारात आणली तिची किंमत ४३ कोटी होती. त्यात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नसल्याचे बापट यांनी तेव्हा सांगितले होते. तसेच मलिक यांना मागील निवडणुकीतील पराभव पचवता आलेला नसल्याने हा आरोप केल्याचेही बापट यांनी म्हटले होते.
आरोप आजही कायम : मलिक
बापट यांनी स्वतःहून हा दावा मागे घेतला. बापट यांनी दावा मागे घेतला असला तरीही तूरडाळ गैरव्यवहाराबाबत त्यांच्यावरचे आरोप आजही कायम असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.