ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २० - माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करन राज्य सरकारवर अविश्वास दाखवणारे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. नागपूरमधील पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. दिवाळीच्या काळात राज्य सरकारने जप्त केलेली दोन हजार कोटी रुपये किमतीची तूरडाळ रेशनवर उपलब्ध न करता व्यापाऱ्यांना परत करताना गैरव्यवहार झाला तसेच गिरीश बापट यांनी २०० कोटींचा घोटाळा केला, असा आरोप नवाब मलिक यांनी गुरूवारी केला होता. त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना बापट यांनी मलिक यांचे आरोप फेटाळून लावले. मलिक यांनी आपल्यावर आरोप करताना चुकीची माहिती दिली, किती डाळीचा पुरवठा करण्यात आला, याची योग्य माहिती त्यांनी घेतलेली नाही. मलिक यांनी राज्य सरकारवर अविश्वास व्यक्त करतानाच माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. त्यामुळे मी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे, असे बापट म्हणाले.