मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. यातच अनेकविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि भाजप यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. यामध्ये भाजप आणि मनसे युतीबाबत चर्चाही राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहेत. यातच भाजपच्या एका बड्या नेत्याने मोठे संकेत दिले आहेत. राजकारणात काही अशक्य नाही, असे सांगत भाजप-मनसे युतीबाबत थेट भाष्य केले आहे.
राज ठाकरे हिंदुत्वाचे विचार मांडत आहे. वरिष्ठ पातळींवर निर्णय होईल, पण मनसे सोबत भाजपची युती होऊ शकते, असा मोठा दावा भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे. राज ठाकरे हिंदुत्वावर बोलत आहेत, हे चांगले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात स्पर्धा आहे. उद्धव ठाकरे म्हणतात राज यांचे हिंदुत्व हे बनावटी आहे. ते बनावटी हिंदू हृदयसम्राट बनायचे प्रयत्न करतायत, असे उद्धव ठाकरे म्हणत आहेत. मात्र कोण ओरिजिनल कोण डुप्लिकेट हे जनता ठरवणार. वेळेवर निवडणुकीत त्यांना त्याचे उत्तर मिळणार आहे, असे सूचक विधान गिरीश महाजन यांनी केले आहे.
राजकारणात काही अशक्य नाही
राजकारणात काही अशक्य नाही. हा सर्व प्रश्न आमच्या वरिष्ठांचा आहे. ते त्याबद्दल निर्णय घेणार. आमचे वरिष्ठ ठरवणार ते आम्हाला मान्य असेल, असा सूतोवाच गिरीश महाजन यांनी केला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. दुसरीकडे, राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यानंतर मनसे भाजपाची बी टीम असल्याचे खोटे महाविकास आघाडी आपल्या इको-सिस्टिमच्या माध्यमातून पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व असून ते कधीही कोणाची बी टीम म्हणून काम करणार नाहीत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे हे सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहेत. तसेच दादर आणि ठाणे येथे झालेल्या सभेत त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला आहे. तसेच ठाण्यात झालेल्या आपल्या उत्तर सभेत त्यांनी राज्य सरकारला ३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवावे, असे अल्टिमेटम दिले आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.