मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १८ दिवस उलटले तरीही राज्यात कोणत्याही पक्षाचं सरकार स्थापन होऊ शकले नाही. तर राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत काँग्रेस व राष्ट्रवादीकडून पाठींब्याचा पत्र शिवसेनेला मिळवता आले नाही. त्यामुळे राज्यपालांनी आता राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. तर राज्यात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपची वेट ऍण्ड वॉचची भूमिका असल्याचे भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले आहे.
राज्यातील सत्ते स्थापनेवरून विविध राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी पक्षाला सत्ते स्थापनेसाठी राज्यपालांनी आज संध्याकाळी 8.30 वाजेपर्यंत वेळ दिला आहे. त्यामुळे राज्यात घडत असलेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर भाजपची नेमकी काय भूमिका आहे, यावर जोरदार चर्चा पाहायला मिळत होती. मात्र गिरीश महाजन यांनी भाजपची बाजू मांडत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
माध्यमांशी बोलताना महाजन म्हणाले की, राज्यात घडत असलेल्या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तसेच काय-काय घडत हे बघण्याचे काम सद्या आम्ही करत असून आमची वेट ऍण्ड वॉचची भूमिका असल्याचे सुद्धा ते म्हणाले. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष दिलेल्या वेळेत आपले बहुमताचे पत्र राज्यपालांकडे सादर करणार का ? आणि त्यानंतर भाजपची काय भूमिका असणार आहे. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादी पक्षाला काँग्रेसने जरीही पाठींबा दिला तरीही त्यांना शिवसेनेचा पाठींबा मिळवणे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. कारण शिवसेनेच्या मदतीशिवाय राष्ट्रवादी किंवा भाजप सत्ता स्थापन करू शकत नाही. त्यामुळे शिवसेना पक्षच शेवटी किंगमेकर ठरणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सोबत जाण्याबाबत उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहणे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे.