अहमदनगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मनधरणीसाठी राळेगण सिद्धीला पोहचलेले राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा विरस झाला आहे. अण्णांशी बंद दाराआड तब्बल तासभर केलेली चर्चा निष्फळ ठरली आहे. अण्णा हजारेंना उपोषणासाठी दिल्लीच्या रामलीला मैदानाच्या वापराची परवानगी मिळाल्यानंतर राजकीय गोटात वेगाने हालचाली सुरु झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष दूत म्हणून महाजन अण्णांकडे पोहचले, मात्र अण्णांनी चर्चेनंतर दिल्लीत उपोषणाचा निर्धार कायम असल्याचे सांगून हवेतर दोन दिवस अधिवेशन दोन दिवसाने वाढवा आणि माझ्या मागण्या मान्य करा असं बजावले आहे.
येत्या २३ मार्चपासून अण्णा हजारे यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानात उपोषणाचा इशारा दिला आहे. लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर करण्यात येणाऱ्या आंदोलनासाठी जागा दिली दिली जात नसल्याबद्दलही अण्णांनी पंतप्रधानांना बारा वेळा पत्र लिहूनही परवानगी मिळत नाही, पोचही मिळत नसल्याने तुरुंगवास पत्करुन तेथूनच आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेरआज दिल्ली नगर निगम कडून अण्णांच्या संस्थेला परवानगीचं पत्र मिळाले. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या गोटात खळबळ माजली. विरोधात असताना ज्या अण्णांच्या आंदोलनाचा लाभ तत्कालिन सत्ताधारी काँग्रेसविरोधात अंसतोष भडकवण्यासाठी झाला त्या अण्णांच्या आंदोलनाला तोंड देण्यापेक्षा ते सुरु होण्यापासूनच रोखण्याची रणनीती भाजपाने ठरवल्याचं सांगितलं जातं. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विश्वासातील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना राळेगण सिद्धीला पाठवले. अण्णांची समजूत काढण्यासाठी महाजन यांनी तासभर त्यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. मात्र अण्णांची समजूत काढण्यात ते अयशस्वी ठरले.
चर्चेनंतर गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या संपर्कात आहेत. अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली आहे. उद्या सकाळपर्यंत पर चर्चा करुन काही निर्णय निघू शकेल. मात्र अण्णा उपोषणाच्या निर्धारावर ठाम असल्याबद्दल विचारले असता, ते म्हणाले की अण्णांचे काही प्रश्न चुटकीसरशी सुटू शकत नाहीत. संसदेचं अधिवेशन सुरु आहे. विधेयक आणावे लागतील. कायदे करावे लागतील. संसदेत शक्य आहे. आता बोलणे झाले आणि आता प्रश्न सुटला असे नाही. काही विषय त्याची व्याप्ती मोठी आहे. ते शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, देशाच्या हिताचे आहेत. मात्र ते तात्काळ सुटू शकत नाहीत.
विविध मागण्यांसाठी अण्णा हजारे २३ मार्च पासून दिल्लीत आंदोलन करणार आहेत. अण्णांकडून करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.अण्णांनी केलेल्या प्रमुख मागण्या - देशातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमिभाव मिळावा-देशात लोकपाल कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी - निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी