मुंबई : राज्याचे जलसंपदा मंत्री आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांनी रविवारी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची सांताक्रुझ येथील निवासस्थानी भेट घेतली. भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतली असून यात कोणताही राजकीय हेतू नसल्याचे महाजन यांनी भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र, सुमारे तासभर ही भेट चालल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.मोठ्या आजारातून भुजबळ बाहेर पडले आहेत. त्यामुळे त्यांना भेटायला आलो होतो. भुजबळांनी पालघरची निवडणूक कशी झाली, काय झाले अशी चर्चा केली. बाकी कोणती राजकीय चर्चा झाली नसल्याचे महाजन म्हणाले. मात्र, अलीकडेच विविध पक्षांच्या नेत्यांनी भुजबळांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी मुंबई दौऱ्यावर आलेले लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव यांनीही भुजबळ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.भुजबळ-महाजन भेटीनंतर पत्रकारांनी सुभाष देशमुखांच्या मुद्द्यावर छेडले असता, जर दोषी आढळलो तर स्वत:च बंगला तोडेन, असे देशमुखांनी म्हटले आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. ते योग्य निर्णय घेतीलच. विरोधकांचे कामच राजकारण करण्याचेच आहे त्यामुळे ते काहीही करतील, असे उत्तर महाजन यांनी दिले.
गिरीश महाजन यांनी घेतली छगन भुजबळांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 2:34 AM