- एटीएसकडून समुपदेशन सुरू
पुणे : इसिस (इस्लामिक स्टेट आॅफ इराक अॅण्ड सीरिया) या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचे पुणे कनेक्शन समोर आले आहे. पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या अवघ्या १६ वर्षांच्या मुलीला इसिसने आपल्या जाळ्यात ओढले आहे. सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून ही मुलगी इसिसच्या संपर्कात आली. अवघ्या चार महिन्यांच्या काळात या मुलीच्या वर्तनात कमालीचा बदल झाला. इसिसच्या संपर्कातील तरुणांच्या सोशल मीडियावरील अनेक ग्रुप्समध्ये ही मुलगी सहभागी झाली. एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर पुणे युनिटकडून या मुलीचे समुपदेशन सुरू करण्यात आले आहे. एटीएसच्या (दहशतवाद विरोधी पथक) पुणे युनिटचे सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएसचे अतिरीक्त महासंचालक विवेक फणसळकर, विशेष महानिरीक्षक निकेत कौशिक यांना पुण्यातील एक मुलगी इसिसच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली होती. तिचा शोध सुरु केला असता शहरातील नामांकित महाविद्यालयात ही मुलगी अकरावी विज्ञान शाखेत शिकत असल्याचे समजले. उच्च विद्याविभूषीत कुटुंबातील ती असून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलेल्या या मुलीला दहावीमध्ये ९० टक्के गुण मिळाले आहेत. चार महिन्यांपूर्वी टीव्हीवर इसिस संदर्भातील बातम्या पाहून तिने या संघटनेची अधिक माहिती मिळवायला सुरुवात केली. वृत्त वाहिनी आणि इंटरनेटमार्फत शोध घेताना श्रीलंकेतील एकाशी तिचा संपर्क झाला. सध्या हा श्रीलंकन तरुण पोलिसांच्या अटकेत आहे. तिला व्हॉट्सअॅप, व्टिटर, टेलिग्राफ आदी ग्रुप्समध्ये सामील करुन घेण्यात आले. फेसबुकवर तिने अकाऊंट उघडले. त्यामध्ये २०० च्या आसपास निवडकच तरुणांना फ्रेन्ड करुन घेतले होते. या ग्रुपमधून तिचे ‘ब्रेन वॉशिंग’ सुरु झाले. ग्रुप्समधे फिलीपिन्स, श्रीलंका, इंग्लंड, केनिया, दुबई, सौदी अरेबिया, युरोपातील तरुणही सदस्य आहेत. राजस्थान, तामीळनाडू, कर्नाटक, जम्मू काश्मिर, आंध्रातील तरुणही या ग्रुपचे सदस्य आहेत. या ग्रुपचा सदस्य मोहम्मद सिराजुद्दीन यालाही नुकतीच राजस्थानात अटक झाली आहे. - अवघ्या चार महिन्यातच तिने जिन्स पँट, मिनी स्कर्ट घालणे सोडून दिले. कुटुंबियांना तिच्यातील बदल जाणवत होता. याबाबत आई-वडील रागावलेही होते. पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यानंतर नेमकी काय उत्तरे द्यायची याबाबतही तिला मार्गदर्शन करण्यात आले होते. ग्रुपमधील कोणत्याही सदस्याशी फोनवर वा प्रत्यक्ष संपर्क न साधता केवळ सोशल मीडियाचाच वापर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. संबंधित मुलीचे समुपदेशन सुरू आहे. इसिसकडून अल्पवयीन मुले आणि मुलींना भडकावण्याचे षड्यंत्र सुरू आहे. पालकांनी आपल्या मुलामुलींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यांच्या राहणीमानातील बदल, सोशल नेटवर्किं ग साईट्सवरील अकाउंट्स, महाविद्यालयातील तसेच बाहेरचे मित्र याची माहिती ठेवावी. - भानुप्रताप बर्गे, सहायक पोलीस आयुक्त, पुणे युनिट