ऑनलाइन लोकमतबुलडाणा, दि. २१ : शेतात शेतकाम करीत असतानाच अस्वल दिसल्याबरोबर झाडावर चढून आपले प्राण वाचविण्याचा पराक्रम १३ वर्षीय अश्विनीने केला आहे. मुलगी झाडावर आणि अस्वल झाडाखाली असा पाठशिवणीचा खेळ १५ मिनिट चालला. हायवेला लागून केवळ १०० फुटावर हा थरार पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी जमली. काही लोकांनी धाडस करुन अस्वलाच्या तावडीतून मुलीला सुखरूप खाली आणले. ही घटना २१ आॅक्टोबर रोजी केळवद शिवारात सकाळी १०.३० च्या दरम्यान घडली. चिखली तालुक्यातील केळवद गावापासून अर्धा कि.मी.अंतरावर हायवेवर अॅड.दिपक पाटील यांच्या शेतात काही महिला सोयाबीनचा सरवा जमा करत होत्या. यामध्ये अश्विनी बालू मोरे (वय १३ वर्षे) ही मुलगी सहभागी होती.
तुरीच्या शेतात सरवा जमा करण्याचे काम सुरु असल्याने शेत पूर्णपणे झाकले होते. यावेळी गिताबाई संतोष बरडे, कमलबाई गजानन मोरे या महिलांना पुढून अस्वल येत असल्याचे दिसले. या महिलांनी आरडाओरड करुन अश्विनीस कल्पना दिली. परंतु, तोपर्यंत अस्वल जवळ आले होते. अश्विनीला एक आंब्याने झाड दिसले, त्यावर ती चढली. तोपर्यंत अस्वल झाडाखाली आले व थांबले. हा थरार १५ मिनिटे चालला. महिला ओरडत रस्त्यावर मदतीच्या उद्देशाने आल्या. तेथून बुलडाणाकडे जात असलेले पोलिस दक्षता पथकाचे प्रमुख प्रभाकर वाघमारे यांना महिलांनी अस्वलाची व मुलगी झाडावर अडकल्याची माहिती दिली. त्यांनी तत्काळया घटनेची माहिती अप्पर पोलिस अधिक्षक श्वेता खेडेकर यांना दिली. श्वेता खेडकर यांनी तात्काळ वनविभागाने डि.एफ.ओ.भगत यांच्याशी संपर्क केला.
डी.एफ.ओंनी आपला ताफा घेवून २० मिनिटांनी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत प्रभाकर वाघमारे यांनी काही लोकांना सोबत घेवून अस्वलाला आरडाओरड करुन हुसकावून लावले व अश्विनी मोरेला सुखरुप वाचविण्यात आले. यानंतर शिवारात सर्च आॅपरेशन राबविण्यात आले. परंतु अस्वल मिळून आले नाही