पूजा दामले, मुंबईवेळ - रात्री ८.३५, ठिकाण - विदर्भ एक्स्प्रेस, बोगी क्रमांक एस-१०़ एका महिलेला प्रसूतिकळा सुरू झाल्या. काय करावे, हे कोणालाच कळत नव्हते. एस-४ बोगीमधून एक डॉक्टर प्रवास करीत असल्याचे टीसीला माहीत होते. तत्काळ त्याने डॉक्टरांना बोलवले. डॉक्टरांनी महिलेला तपासल्यावर बाळ बाहेर येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पाय आधी बाहेर आल्याने ही सामान्य प्रसूती नव्हती. बाळाचा आणि आईचा जीव वाचवण्यासाठी उपलब्ध असलेल्या साधनांमध्ये त्यांनी प्रसूती केली़ ९ वाजून ८ मिनिटांनी त्या महिलेने एका मुलीला जन्म दिला. १८ जुलै रोजी १२१०५-विदर्भ एक्स्प्रेस नेहमीच्या वेळी सुटली. या ट्रेनमधून पूजा राठोड ही महिला नातेवाइकांसह नागपूरला जात होती. तिला आठवा महिना सुरू होता. डॉक्टरांनी तिला १८ आॅगस्ट ही प्रसूतीची तारीख दिली होती. याच गाडीत कल्याण येथून सायन रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल मोरे चढले होते. प्रवासादरम्यान टीसी त्यांचे तिकीट चेक करून गेल्यावर पुन्हा १० ते १५ मिनिटांनी त्यांच्याजवळ आला. एस-१० या बोगीमध्ये एका गर्भवती महिलेच्या पोटात दुखत असल्याचे त्याने सांगितले. त्या महिलेला तपासण्यासाठी डॉक्टर एस-१० बोगीमध्ये गेले. आडगाव स्थानकावरून गाडी सुटल्यावर ९ वाजून ८ मिनिटांनी या महिलेने एका मुलीला जन्म दिला. या बाळाचे वजन साधारण २ किलो इतके होते. बाळाला बाहेर काढल्यावर ते रडत नव्हते़ हृदयाचे ठोके नीट ऐकू येत नव्हते. बाळाच्या हृदयाचे ठोके सामान्यपणे सुरू व्हावेत, म्हणून बाळाला मसाज सुरू केला. १० मिनिटांनी बाळ रडायला लागले. बाळाची आणि आईची प्रकृती स्थिर होती. यानंतर, इगतपुरी स्थानकावर गाडी थांबल्यावर आई आणि बाळाला जवळच्या रेल्वे रुग्णालयात नेण्यात आले़ आता दोघांचीही प्रकृती चांगली असल्याचे डॉ. अनिल यांनी सांगितले.
...धावत्या एक्स्प्रेसमध्ये झाला मुलीचा जन्म
By admin | Published: August 04, 2014 3:37 AM