अमरावती - एका अल्पवयीन मुलीवर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी घडल्याच्या वृत्ताने राज्यभरात खळबळ उडाली. मात्र, त्या तरुणीवर उकळते तेल फेकल्याची कबुली पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी दिली आहे. प्रेमप्रकरणातून एका तरुणाने हे कृत्य केल्याचे उघड झाले.या प्रकरणात फे्रजरपुरा पोलिसांनी सुशील विलास मेश्राम (२०, रा. बोकुलखेडा, भातकुली) व भूषण हरिश्चंद्र उईके (१९,रा. सुकळी बनारसी) यांना मंगळवारी मध्यरात्रीनंतर अटक केली. शाळा सुटल्यानंतर पीडित मुलगी मैत्रिणीसोबत शिवटेकडीकडून काँग्रेसनगर मार्गेे घरी जात होती. दरम्यान दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी थर्मासमधील उकळते पदार्थ शाळकरी मुलीच्या अंगावर फेकून पळून गेले. त्यामुळे ती मुलगी १६ टक्के भाजली गेली. तिला काही नागरिकांनी तत्काळ इर्विन रुग्णालयात दाखल केले. मुलीवर अॅसिडहल्ला झाल्याचे वृत्त शहरात वाºयासारखे पसरले. या घटनेमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली. पोलिसांनी तत्काळ पीडित मुलगी व तिच्या मैत्रिणीच्या माहितीवरून आरोपी तरुणांचा शोध घेतला. मंगळवारी मध्यरात्रीनंतर पोलिसांनी पाच तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यापैकी सुशील मेश्राम व भूषण ऊईके यांनीच मुलीच्या अंगावर उकळते तेल फेकल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दोघांनाही अटक करून त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३२६ अन्वये गुन्हा नोंदविला.
अशी आहे घटनेची सत्यता एप्रिल महिन्यात बेलपु-यातील एका लग्न समारंभात आरोपी सुशील मेश्राम व पीडित मुलीची ओळख झाली. सुशीलचे त्या मुलीवर एकतर्फी प्रेम जडले. दोघेही मोबाईलवर एकमेकांशी संवाद साधत होते. पीडित मुलगी दुस-या तरुणांशी बोललेली सुशीलला आवडत नसे. या विषयावर त्यांच्यात वाद झाला. त्या मुलीने सुशीलच्या कानशिलात लगावली होती. नेमका तोच राग सुशीलच्या मनात होता. त्यामुळे त्याने मुलीच्या अंगावर उकळते तेल फेकण्याचा प्लॅन रचला. मंगळवारी घटनेच्या दिवशी सुशीलने त्याचा मित्र भूषणच्या माध्यमातून एका मित्राची एमएच २७ बीएच ७३५७ क्रमांकाची दुचाकी बोलावली. दुचाकीची ओळख न पटण्यासाठी सुशीलने त्यावरील क्रमांकावर लाल रंगाचे स्टिकर्स चिपकविले आणि दोघेही हेल्मेट घालून घटनास्थळाच्या दिशेने गेले. दरम्यान, त्यांनी एका दुकानातून थर्मास विकत घेतला आणि श्यामनगरातील ओळखीच्या महिलेकडे गेले. गाडीच्या शॉकअपमध्ये गरम तेल टाकायचे असल्याचा बहाणा करून त्यांनी त्या महिलेकडे कढईत तेल गरम केले. उकळते तेल सुशीलने थर्मासमध्ये भरले. बाहेर दुचाकीवर उभा असलेल्या भूषणला घटनास्थळाच्या दिशेने चालण्यास सांगितेल. पीडित मुलगी शाळेतून घरी जात असताना सुशीलने तिच्या अंगावर उकळते तेल फेकले.
थर्मास, कढई, हेल्मेट, कपडे, दुचाकी जप्तसुशील हा बी.ए. तृतीय वर्षाला शिकतो. भूषण वाहन दुरुस्तीचे काम करतो. या दोघांनी वापरलेले हेल्मेट, थर्मास, कढई, दोघांचेही कपडे, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली.
मे महिन्यात राजापेठला तक्रारसुशीलचा एकतर्फी प्रेमप्रकरणातील वाद राजापेठ पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला होता. यासंबंधाने पीडित मुलीने मे महिन्यात सुशीलविरुद्ध तक्रार नोंदविली होती. त्यावेळी दोघांच्या कुटुंबीयांना पोलिसांनी बोलावून समज दिली होती. दोघांचाही वाद सामंजस्याने मिटविला होता.