नागपूर : एका मुलीच्या हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करून मुलाला निर्दोष सोडण्याचे निर्देश दिले आहेत. आंतरधर्मीय प्रेम प्रकरणातून घडलेली ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील आहे.दीपक कुंडलिक कांबळे (२७) असे संशयिताचे नाव असून, चंडोल ता. बुलडाणा येथील रहिवासी आहे. त्याचे गावातच राहणाऱ्या मुस्लीम मुलीवर प्रेम होते. २९ मे २०११ रोजी दोघांनाही चाकूने भोसकण्यात आले. ३१ मे रोजी मुलीचा मृत्यू झाला आणि दीपक बचावला. मुलीने लग्नासाठी नकार दिल्यामुळे दीपकने तिची हत्या केली व स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असे सरकारी पक्षाचे म्हणणे होते. बुलडाणा सत्र न्यायालयाने दीपकला भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त सश्रम कारावास, तर कलम ३६६ अंतर्गत पाच वर्षे कारावास व ५००० रुपये दंड. दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त सश्रम करावासाची शिक्षा सुनावली होती.या विरुद्ध दीपकने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा आदेश रद्द केला. उच्च न्यायालयात सरकारी पक्षाला आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करता आला नाही. ‘आंतरधर्मीय प्रेमामुळे मुलीचे नातेवाईक संतप्त होते. घटनेच्या दिवशी दीपकने मुलीला भेटायला बोलावले होते. त्याचवेळी मुलीच्या नातेवाईकांनी तेथे पोहोचून दोघांनाही ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी स्वत:चा बचाव करून दीपक पळून जाण्यात दीपक यशस्वी झाला,’ असा घटनाक्रम घडला असण्याची शक्यता उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेत व्यक्त केली. (प्रतिनिधी)
प्रेयसीच्या हत्येप्रकरणी प्रियकर निर्दोष
By admin | Published: November 17, 2015 1:05 AM