- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहावीच्या निकालात मुंबई विभागात मुलींचे वर्चस्व दिसून आले आहे. निकालाचा टक्का घसरला असला तरी उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या कायम आहे. कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २० हजार अधिक विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसले होते, अशी माहिती मुंबई विभागीय अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी दिली. मार्च ते एप्रिलदरम्यान दहावीची परीक्षा राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आली होती. मुंबई विभागातून दहावीच्या परीक्षेला ३ लाख ४३ हजार ९९१ नियमित विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ३ लाख ४२ हजार ९७३ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून, ३ लाख ८ हजार ९९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच मुंबई विभागाचा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल हा ९०.०९ टक्के लागला आहे. मुंबई विभागातून पुनर्परीक्षार्थी (रिपिटर) विद्यार्थ्यांची संख्या ४१ हजार ९८३ इतकी होती. त्यापैकी १८ हजार १६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजे पुन्हा परीक्षेला बसून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ४३.२६ टक्के इतकी आहे. मुंबई विभागात प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत ७२ हजार ७१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर १ लाख ४ हजार ९९९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून, द्वितीय श्रेणीत ९८ हजार ६१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तृतीय श्रेणीत ३२ हजार ६७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याप्रमाणे एकूण ३ लाख ८ हजार ९९६ नियमित विद्यार्थी मुंबई विभागातून उत्तीर्ण झाले आहेत. अरेबिक, फ्रेंच, आॅटोमोबाइल सर्व्हिस टेकनिक, ब्युटी अॅण्ड वेलनेस, फिजिकल एज्युकेशन या विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मुंबई विभागातून एकूण ३ हजार ६४४ शाळांमधून १ लाख ८१ हजार २ मुले आणि १ लाख ६१ हजार ९१७ मुली दहावीच्या परीक्षेस बसल्या होत्या. त्यातील १ लाख ६० हजार १३८ मुले तर १ लाख ४८ हजार ८५८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ८८.४७ टक्के तर मुलींचे प्रमाण ९१.९० टक्के इतके आहे. २८ हजार ९७१ मुले आणि १३ हजार १२ मुली या पुनर्परीक्षार्थी होत्या. त्यातील ११ हजार ८७२ मुले आणि ६ हजार २८८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यात मुले पास होण्याची टक्केवारी ४०.९८ टक्के आणि मुली पास होण्याची टक्केवारी ४८.३२ टक्के इतकी आहे. ८ शाळांचा शून्य टक्के निकाल मुंबई विभागातील ८ शाळांचा निकाल हा शून्य टक्के लागला आहे. तर, १ ते १० टक्के निकाल लागणाऱ्या शाळांची संख्या ४ आहे. ३ हजार ६३६ शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे.