नवी मुंबई : धावत्या रेल्वेतून उडी मारुन तरुणीने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी नेरुळ येथे घडली. सदर घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता तिचा मृत्यू झाला. झडतीमध्ये तिच्याकडे चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये कुटुंबीयांच्या शैक्षणिक अपेक्षा पूर्ण करु शकत नसल्याच्या कारणाचा उल्लेख आढळून आला आहे.अश्विनी कारखिले (१९) असे मयत तरुणीचे नाव असून ती नेरुळ सेक्टर १ ची राहणारी आहे. शुक्रवारी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास तिने रेल्वेतून उडी मारुन आत्महत्या केली. अश्विनी ही बी.एस्सी.ची विद्यार्थिनी असून क्लासला जाण्यासाठी घरातून बाहेर निघाली होती. यानुसार बेलापूर-वाशी रेल्वेतून प्रवास करताना तिने राजीव गांधी पुलालगत रेल्वेबाहेर उडी मारली. गंभीर जखमी अश्विनीला लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. नेरुळ पोलीस व वाशी रेल्वे पोलीस यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता अश्विनीची बॅग त्यांच्या हाती लागली. परंतु आत्महत्येच्या प्रयत्नात ती गंभीर जखमी झालेली असल्यामुळे पोलीस तिची चौकशी करू शकले नाहीत. काही वेळातच तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाल्यामुळे शिवाय अपघातामध्ये दोन्ही पाय गमावल्याने पुढील उपचारासाठी तिला वाशीतील मनपा रुग्णालयात हलवण्यात आले. त्याठिकाणी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात तिच्या आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन ताब्यात घेतलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये अश्विनीने लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. ही चिठ्ठी अश्विनीने आईला उद्देशून लिहिलेली असल्याचे वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन बोबडे यांनी सांगितले. कौटुंबिक आर्थिक बेताची, त्यात घरच्यांकडून तिच्या शैक्षणिक अपेक्षा असल्याने ती दडपणाखाली होती.
रेल्वेतून उडी मारून तरुणीची आत्महत्या
By admin | Published: May 21, 2016 2:35 AM