गौरीशंकर घाळे, मुंबईकेंद्रीय अवजडमंत्री अनंत गीते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम या दोन्ही शिवसेना नेत्यांमधील संघर्ष सर्वज्ञात आहे. या दोन्ही नेत्यांनी जाहीर व्यासपीठांवरून एकमेकांची उणीदुणी काढण्यासही मागे-पुढे पाहिले नव्हते. गीते-कदम संघर्षासमोर पक्षनेतृत्वानेही हात टेकल्याचे बोलले जायचे. कोकणातील या दिग्गजांनी आता संघर्षाचा पवित्रा मागे सारत एकत्र येण्याचे संकेत दिले असून, त्या दृष्टीने दोन्ही नेत्यांमध्ये रविवारी चर्चा झाल्याचे समजते. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी रविवारी विलेपार्ले येथे अनंत गीते यांची भेट घेतली. गीते यांच्या पार्ल्यातील कार्यालयात झालेल्या या भेटीदरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर, शिवसेना उपनेते विजय कदमही उपस्थित होते. गीते-कदम यांच्या भेटीमुळे कोकणातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत रामदास कदम यांना गुहागर मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला होता. पक्षांतर्गत विरोधकांमुळे पराभव पत्करावा लागल्याचा आरोप करत, कदम यांनी अनेकदा अनंत गीतेंवर निशाणा साधला होता, तर कदम यांनी लोकसभा निवडणुकांदरम्यान अडचणीत आणल्याचा दावा गीते यांनी केला होता. या दोन्ही नेत्यांमधील वादामुळे शिवसेनेला कोकणात फटकाही सहन करावा लागला होता. एकीकडे विश्वासू अनंत गीते, तर दुसरीकडे आक्रमक रामदास कदम हा तिढा पक्षप्रमुखांसाठीही डोकेदुखी ठरली होती. रविवारी मात्र, या दोन्ही नेत्यांना एकत्र या वादावर पडदा पाडण्याचे संकेत दिले आहेत. कोकणातील मराठा मोर्चांमध्ये शिवसेनेचे अस्तित्व दिसायला हवे. शिवसेनेने या मोर्चात सक्रीय सहभाग घ्यावा, अशी उद्धव ठाकरेंची इच्छा आहे. सरकारविरोधी जनमत स्वत:कडे ठेवायचे असेल, तर कोकणातील दोन्ही नेत्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे, यासाठी मिलिंद नार्वेकर यांनी शिष्टाई केल्याचे समजते. शिवाय, रामदास कदम यांचा छोटा मुलगा योगेश कदम याच्या भावी राजकारण प्रवेशाचा मार्ग सुकर करण्यासाठी रामदास कदमांनी सहकार्याच्या राजकारणाला पसंती दिल्याचे बोलले जात आहे.
गीते-कदम यांच्या दिलजमाईचे संकेत
By admin | Published: September 26, 2016 3:09 AM